प्रिय भाऊ ,
आज सकाळीच तुमच्या निधनाची धक्कादायक बातमी समजली. ऐकताच मन विषण्ण झाले. माझाच माझ्यावर विश्वास बसत नव्हता. कोणी सांगत होते भाऊंनी नळदुर्गच्या किल्ल्यावरून उडी मारली, तर कोणी अपघात झाल्याचे सांगत होते. उशिराने कळले तुम्ही स्वतःला संपवून घेतले; पण असं का केलंत ? काहीच अंदाज बांधता येत नाही.
भाऊ, तुम्ही किती कष्टातून आजचं साम्राज्य उभं केलं. याची फार कमी लोकांना कल्पना आहे. मोठे बंधू बलभीमभाऊंनी कॉलेज जीवनात अनंत अडचणींचा सामना केला. आर्थिक चणचण भासत असताना तुम्हाला सोबत घेऊन लकी चौकाच्या रस्त्यावर टेबल टाकून लॉटरीची तिकिटे विकणे सुरू केले. गरिबी इतकी की रोज विकलेल्या तिकिटातून शिक्षणाचा खर्च भागवायचा आणि दुसऱ्या दिवशी विक्रीसाठी तिकिटे आणायची, पण तुम्ही जिद्द सोडली नाही. सचोटीने व्यवसाय केलात. गोकुळ लॉटरी हे नाव शहरात नावारूपाला आणलं.
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केले. त्यातून काही पैसे मिळाले. स्वतःच्या गावात साखर कारखाना उभारण्यात आला; पण त्या कारखान्यात संचालक होता येत नाही. याचे शल्य बंधू बलभीमभाऊंना सतत बोचत होते. तुम्ही त्यांना धीर दिलात. आपल्या मालकीचा कारखाना उभा करू, चिंता करू नका, असे सांगून त्याच दिवसापासून कामाला लागलात. कष्ट, कष्ट आणि कष्टच करीत रुदेवाडी येथे मातोश्री लक्ष्मी शुगर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. काही वर्षांतच धोत्रीच्या माळरानावर नव्या कारखान्याच्या उभारणीचे मनसुबे आखले आणि वर्षभरात कारखाना उभा करून दाखवला.
साखर कारखान्याचा मालक असा रुबाब तुमच्या वागण्या - बोलण्यात कधीच दिसला नाही. अत्यंत मृदू स्वभाव, मोहक बोलणं, समोरच्याला नवनव्या योजना सांगून नवी स्वप्नं त्यांच्याही मनात रूजवणं असा तुमचा स्वभाव. तुम्ही कधी कोणावर रागावल्याचे दिसले नाही. बोलताना कधी आवाज चढवला नाही. समोरच्या माणसाचं मन जपण्याचा तुमचा स्वभाव होता. कारखानदारीत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तुमच्याही समोर असे प्रश्न उभे ठाकले. जना-मनाची लाज राखताना तुमची किती कुचंबणा व्हायची, हे आम्ही पाहिले आहे. शेतकऱ्यांसमोर दोन्ही हात जोडून विनवणी करणारा साखर कारखानदार केवळ तुम्हीच. प्रसार माध्यमातून टीका झेलताना तुम्ही विचलित झाला नाही. मग आजच असं का केलं. आलेल्या संकटाला ताेंड देत मार्गक्रमण करताना तुमची द्विधा मन:स्थिती व्हायची. ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे जत्थे तुमच्या दारात अनेकदा आले. तुम्ही संयम सोडला नाहीत.
मनमिळावू स्वभावाच्या भगवान भाऊंनी असे पाऊल का उचलले हा प्रश्न अनुत्तरितच आहे. खरं तर तुमचा स्वभाव इतका भावनिक की समोरचा माणूस पाहताच तुम्ही त्याला काय बोलावं, त्याची समजूत कशी घालावी अशी तुमच्या मनाची घालमेल व्हायची. आज मात्र तुम्ही खूपच धाडस केलंत. व्यवहारकुशल असूनही तुमचं आर्थिक गणित कोलमडलं कसं? असा अनेकांना प्रश्न पडतो. याची चर्चा करताना तुम्ही नेहमी दोन्ही हात वर करून देवावर हवाला ठेवायचा. आजच असं हतबल होण्याचं काय कारण? याचा उलगडा होत नाही. तुमची कल्पकता, नावीन्याची ओढ , सतत कार्यमग्न यामुळेच गोकुळ परिवाराची वेल वाढत राहिली. छोट्या रोपट्याचे विशाल वृक्ष झाले. स्वप्नांचे मनोरे रचत तुम्ही अचानक घेतलेली एक्झिट अस्वस्थ करणारी आहे.
- नारायण चव्हाण, सोलापूर