ग्रामपंचायत निवडणुकीत महत्त्वाचा टप्पा म्हणजे सरपंच निवडीसाठी राजकारणातील अनेक गमतीदार किस्से पुढे येत आहेत. बैठकांमध्ये सरपंच निवडी ठरल्या होत्या. त्यामुळे सरपंच निवडीसाठी गावकारभाऱ्यांनी जंगी उत्सव करायचे नियोजन केले. तेव्हा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. यामुळे बाकी निवडी रखडल्या. गावकारभाऱ्यांनी केलेल्या तयारीवर पाणी पडले आहे. निवडी नेमक्या कधी याचा अंदाज बांधत दोन दिवस थांबा, असा सल्ला कार्यकर्ते व हालगी मंडळाला दिला जात आहे.
सरपंचपद साडेसातीच्या फेऱ्यात
या निवडणूक टप्प्यातील सरपंच पदांवर अनेकवेळा गंडांतर आल्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. आरक्षणाची सोडत निवडणुकीपूर्वी न काढल्यामुळे अनेकांचे सरपंच पदाचे उमेदवार चुकले आहेत. त्यानंतर शिक्षणाच्या अटीमुळे या पदाची भीती असतानाच आरक्षण सोडती पुढे ढकल्याने तालुक्यातील आरक्षण सोडत पुन्हा होणार की काय? अशी धास्ती गाव कारभाऱ्यांना लागली आहे. यामुळे सरपंचपद साडेसातीच्या फेऱ्यात सापडल्याची चर्चा गावगाड्यात दिसत आहे.