जयश्री नंदकुमार चव्हाण (वय २५, रा. शिरढोण, ता. पंढरपूर) यांची अक्कलदाढ दुखत होती. यामुळे नंदकुमार भागवत चव्हाण हे त्यांची पत्नी जयश्री चव्हाण यांना मंगळवारी पंढरपुरातील नवीन बसस्थानक परिसरातील डॉ. गांधी यांच्या दातांचा दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आले. उपचारादरम्यान डॉ. गांधी यांनी जयश्री यांना भूल दिली, त्यानंतर दाढ काढली. काही वेळानंतर त्यांना अशक्तपणा जाणवू लागला. यामुळे डॉक्टरांनी त्यांना गोळी दिली. यानंतर त्यांना उलटी झाली. व जयश्री बेशुध्द पडल्या. यामुळे डॉ. गांधी यांनीच जयश्री यांना उपचारासाठी इतर रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे जयश्री यांचा मृत्यू झाल्याचे नंदकुमार चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
मृतदेह पोलीस ठाण्याच्या दारात
योग्य उपचार न मिळाल्याने जयश्री नंदकुमार चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मृत्यू पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याच्या गेटसमोर मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवला. परंतु पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेता येणार नाही, यासाठी कायदेशीर काही अडचणी आहेत असे सांगितल्यानंतर नातेवाईक मृतदेह घेऊन गेले. जयश्री चव्हाण यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, मुलगा, सासू, सासरा असा परिवार आहे.
----
तीन रुग्णालयात उपचाराचा प्रयत्न
दाढेवरील उपचारानंतर संबंधित महिलेला अस्वस्थ वाटू लागले. यामुळे डॉ. सागर गांधी यांनी प्रथम त्यांना पंढरपुरातील दोन खासगी रुग्णालयात नेेले. तेथून सोलापूर येथे उपचारासाठी नेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
----
या प्रकरणी वैद्यकीय तज्ज्ञ समितीकडून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. अहवालानंतर कोणाचीही गय केली जाणार नाही.
- अरुण पवार, पोलिस निरीक्षक, पंढरपूर
----
फोटो : २५पंढरपूर, २५ जयश्री चव्हाण
पंढरपूर शहर पोलीस ठाण्यासमोर मृत महिलेच्या नातलगांची गर्दी.