सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूरच्या लोकसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवित आहेत. ज्या विचारधारेतून बहुजन समाज पक्ष उभा राहिला, त्याच घराण्यातील व्यक्तीच्या विरोधात उमेदवार देत असतील तर ते योग्य राहणार नाही. त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्यात येऊ नये, यासाठी प्रभारी महासचिव अॅड. संजीव सदाफुले यांना विनंती पत्र देणार असून, जर भूमिका बदली नाही तर मी पक्षाचा व प्रसंगी नगरसेवक पदाचा राजीनामा देईन, अशी आक्रमक भूमिका आनंद चंदनशिवे यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, राहुल सरवदे यांनी बसपातर्फे सोलापूर लोकसभेसाठी मंगळवारी दुपारी अर्ज भरला.
चंदनशिवे पुढे म्हणाले की, १९५२ सालच्या स्वतंत्र भारतातील पहिल्याच निवडणुकीत, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. कोणत्याही परिस्थीतीत बाबासाहेब हे संसदेत जाऊ नये म्हणुन, काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार उभा करून त्यांचा पराभव केला होता. हा पराभव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याचा विचार करावा, अन्यथा आंबेडकर या नावाच्या विरोधात जाणे मला तरी शक्य होणार नाही. असे झाल्यास मी पक्षाचा राजीनामा देईन त्यापुढे माझे नगरसेवकपदही सोडायला तयार आहे असे आनंद चंदनशिवे यांनी सांगितले.
पक्ष श्रेष्ठींचा आदेश असल्यानेच बसपाचा उमेदवार : अॅड. संजीव सदाफुले
बहुजन समाज पार्टी म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावरच चालणारा पक्ष आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठीने दिलेल्या आदेशानुसारच बसपाचा उमेदवार दिला जात आहे. आनंद चंदनशिवे हे व्यक्तीगत मत आहे़ त्यांनी असे काही करू नये, त्यांनी पक्षाचा आदेश पाळावा. ते आदेश पाळत नसतील तर मग आमचा नाईलाज आहे, असे मत बहुजन समाज पार्टीचे प्रदेश प्रभारी अॅड. संजीव सदाफुले यांनी व्यक्त केले.
अर्ज माघारी घेतला जाऊ शकतो : चंदनशिवे
बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराचा अर्ज कायम राहिला तर मी वंचित बहुजन आघाडीचे काम करेऩ त्यासाठी पक्षाचा तसेच नगरसेवक पदाचाही राजीनामा देईन, अशी आक्रमक भूमिका बसपा नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी मंगळवारी दुपारी तीननंतर घेतली आहे़