सोलापूर : पार्क स्टेडियममधील गाळ्यांचा बांधकाम परवाना, त्यासंबंधी कागदपत्रे आणि नकाशे याची माहिती महापालिकेतून गहाळ झाली आहेत. अशा आशयाची माहिती पार्क रोड शोरुम्स असोसिएशनच्या पदाधिकाºयांना माहिती अधिकारात विचारलेल्या अर्जातून देण्यात आली आहे, असा आरोप असोसिएशनचे अध्यक्ष केतन शहा यांनी बुधवारी केला.
शहा म्हणाले, श्रीनिवास गोयल या व्यापाºयाने २६ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला अर्ज दिला होता. इंदिरा गांधी स्टेडियम लगत बांधण्यात आलेल्या ५९ गाळ्यांचा बांधकाम परवाना, नकाशा, मालमत्ता पत्रकांची छायांकित प्रत द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. फेब्रुवारी महिन्यात बांधकाम विभागाने उत्तर दिले आहे. हा बांधकाम परवाना व त्यासंबंधीची कागदपत्रे शोधण्याचे काम सुरू आहे. नस्ती उपलब्ध झालेली नाही.
कागदपत्रे उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला देण्यात येतील. आणखी १५ दिवसांची मुदत द्या, असे सांगितले आहे. वास्तविक पार्क स्टेडियमची जागा ही शासनाची आहे. महापालिकेचा त्याच्याशी संबंध नाही. तात्या कोठे यांनी फडकुले फाउंडेशनसाठी इंदिरा गांधी स्टेडियम लगतची जागा १ कोटी ५९ लाख रुपयांना महापालिकेकडून खरेदी करुन घेतली होती. त्याची तक्रार पंतप्रधान कार्यालयाकडे गेल्यानंतर महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पैसे वर्ग केले होते. स्टेडियमवर महापालिकेचा अधिकार नाही.
तरीही व्यापाºयांना नाहक त्रास देण्याच्या दृष्टीने काम केले जात आहे. मुळातच महापालिकेकडे बांधकाम परवान्याची कागदपत्रे नाहीत. पण आता त्याचा शोध घेत असल्याचे सांगत आहेत, असा आरोपही शहा यांनी केला.
लक्ष्मण चलवादींना काम जमत नाही : शहा- पार्क स्टेडियमसह शहरातील गाळे धारकांना रेडिरेकनरप्रमाणे भाडे भरण्याच्या नोटिसा देण्यात येत आहेत. हे रेडिरेकनर दर नगररचना कार्यालयाचे सहायक उपसंचालक लक्ष्मण चलवादी आणि इतर लोकांनी संकलित केले आहेत. चलवादी यांना काम जमत नाही, असे अनेकदा दिसते. कामात घोळ घालत राहतात म्हणून त्यांना बाजूला करण्यात आले आहे. त्यांनी चुकीचे रेडिरेकनर दर भूमी व मालमत्ता कार्यालयाला दिले आहेत. त्यामुळे अनेक गाळेधारक महापालिका उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांच्याकडे तक्रार करीत आहेत, असेही केतन शहा यांनी सांगितले.