रात्री झालेल्या मुसळधार पावसाने बक्षीहिप्परगे गावाजवळील ओढ्याला पूर आला आहे. सकाळी नेहमीप्रमाणे येथील शेतकरी बाबासाहेब नवनाथ माने आपल्या बैलगाडीतून शेताकडे निघाले होते. त्यांनी आपल्यासोबत घरातील पाच चिमुकल्यांना गाडीत घेतले. बैलगाडी पुलाच्या काठावर आली असता पाण्याचा अंदाज काही येत नव्हता. काही वेळ विचार करून शेतकऱ्याने बैलगाडी पाण्यात घातली. दरम्यान, प्रवाहाच्या मधोमध गेल्यावर गाडी पाण्यात उलटली आणि प्रवाहाबरोबर वाहू लागली. यावेळी बैलांच्या गळ्याला फास लागल्याने त्यांना बाजूला पडता येईना. त्यामुळे तडफडून दोन्ही बैल पाण्यात बुडाले आणि काही अंतरावर त्यांचे मृतदेह बाहेर आले.
शेतकरी बाबासाहेब माने आणि लक्ष्मण गायकवाड हे बैलगाडीत होते. बैलगाडी उलटताच दोघांनी पाण्यात उड्या मारल्या. लक्ष्मण हे गटांगळ्या खात पाण्याबाहेर आले तर बाबासाहेब माने बैलांना वाचविण्याच्या प्रयत्नात काही अंतर वाहत गेले. शेवटी जीव वाचविण्यासाठी बाहेर पडले म्हणून वाचले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी ओढ्याकडे धाव घेतली. बैलांचे मृतदेह बाहेर काढले. त्यांचा पंचनामा करण्यात आला. दीड लाख रुपये किमतीची बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
..............
सात जीव सुदैवाने बचावले
या बैलगाडीत बसून बाबासाहेब माने यांच्या कुटुंबातील पाच मुले शेताकडे निघाली होती. शेजारी राहणारे बळी माने यांनी या चिमुकल्यांना खाली उतरण्यास सांगितले. मौजमजा करण्यासाठी शेताकडे जाणारी चिमुकली ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. शेवटी माने यांनी त्यांना सक्तीने खाली घेतले आणि ओढ्याच्या काठावरून घरी पाठवले म्हणून ती बचावली. बैलगाडी चालक बाबासाहेब माने आणि लक्ष्मण गायकवाड यांनीही प्रसंगावधान राखून ओढ्यात उड्या मारून पैलतीर गाठले. त्यामुळे सातजणांचा जीव वाचला.
..............
पुलाची उंची वाढविण्याची मागणी
बक्षीहिप्परगे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला मुसळधार पाऊस झाला, तर मोठा पूर येतो. कधी-कधी तर दिवसभर वाहतूक ठप्प होते. दोन वर्षांपूर्वी या पुलावरुन पाणी वाहत असताना एका तरुणाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला होता. त्यामुळे या ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करत आहेत.
.............
नैसर्गिक आपत्तीत गरीब शेतकऱ्याची बैलजोडी मृत्यूमुखी पडल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे संपूर्ण जीवन शेतीवर अवलंबून असून, आता त्यांच्याकडे दुसरे साधन नाही. शासनाने शेतकऱ्याला बैलजोडीची किंमत नुकसानभरपाई म्हणून द्यावी.
- विश्रांत गायकवाड, ग्रामस्थ, बक्षीहिप्परगे
................
गावाजवळच्या ओढ्यावरील पुलाची उंची वाढविण्याची मागणी जुनी आहे. याबाबत मी स्वतः लक्ष घालत आहे. लवकरात लवकर हा पूल मंजूर होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. ही घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
- सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट