रेवणसिद्ध जवळेकर
सोलापूर : व्यापारी, शेतकरी अन् माथाडी कामगारांना अक्षरश: श्वसनाचे विकार जडावेत... असे लाईव्ह चित्र सोमवारी दुपारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फेरफटका मारताना ‘लोकमत’ चमूला पाहावयास मिळाले. राज्यात चौथ्या क्रमांकावर असलेल्या मार्केट कमिटीचा धूळ अन् फुफाट्यानं श्वास गुदमरतोय. रस्ते अन् धुळीचा बंदोबस्त करा; अन्यथा समितीच्या सचिव कार्यालयात आवारातीलच माती फेकून ‘धूळ’ चारण्याचा इशारा व्यापारी मतदारसंघातील संचालक बसवराज इटकळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
हैदराबाद रोडवरील विस्तीर्ण जागेत उभारलेल्या समितीच्या आवारात सुमारे एक हजार व्यापारी आहेत. त्यात अडत-भुसार व्यापारी, भाजीपाला, फळे, कांदा बाजार आदी विभाग आहेत. मार्केट यार्डात रोजच्या रोज शेतीमाल घेऊन शेतकरी दाखल होत असतात. दररोज एक हजाराहून अधिक ट्रक माल घेऊन इथे येतात. इथल्या प्रत्येक व्यापाºयावर मार्केट कमिटीचे अंकुश असते. रोजच्या उलाढालीनुसार व्यापाºयांकडून बाजार फी आणि देखरेख फी वसूल केली जाते. देखरेख करानुसार दरमहा ५ तारखेला शेकडा १ रुपये २० पैसे वसूलही केले जाते. त्यानंतर दंडाची तरतूद असल्याने व्यापारी मुकाटपणे कर भरत असतात. असे असताना आज मार्केट कमिटीचा श्वास धूळ अन् जोराचे वाहन गेले तर फुफाट्याने गुदमरतोय.
भुसार-अडत व्यापारी संघानेही फोडला टाहो- आज बाजार समितीच्या आवारात वावरणे मुश्कील झाले आहे. इथे प्रत्येकाला तोंडाला रुमाल लावूनच वावरावे लागते. आज जो-तो व्यापारी खासगीत बोलताना समितीच्या कार्यावर संताप व्यक्त करतो. मात्र पुढे कोणीच येत नाहीत. व्यापारी, शेतकरी, कर्मचारी, कामगारांच्या प्रश्नांसाठी भुसार- अडत व्यापारी संघाने १२ जानेवारी रोजी बाजार समितीच्या सचिवांना लेखी पत्र देऊन गाºहाणीचा पाढाच वाचला आहे. आज १७ दिवस झाले तरी मार्केट कमिटीच्या प्रमुखांसह संचालक मंडळ गांधारीच्या भूमिकेतच असल्याचा आरोपही व्यापाºयांनीही नाव छापू नका, या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना केला. या निवेदनाची एक प्रत संचालक बसवराज इटकळे यांना देण्यात आले आहे.
रस्त्यांची लागली वाट; आजाराला आमंत्रण- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकही रस्ता धड नाही. सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. दुचाकीवरुन वावरणाºया व्यापाºयांना, कर्मचाºयांना मणक्याचे आजार उद्भवू लागले आहेत. धुळीमुळे तर माथाडी कामगारांचे आयुष्य कमी होईल की काय ? अशी भीती नाव न सांगण्याच्या अटीवर काही कामगारांनी व्यक्त केली.
बुधवारच्या सभेत जाब विचारणार- इटकळे- बुधवारी (३० जानेवारी) कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक होणार आहे. तत्पूर्वी आपण समितीच्या आवारातील अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सचिवांना इशारा देणारे एक पत्र सादर केले आहे. बुधवारच्या बैठकीत आवारातील रस्ते, धूळ, पाणी आदींबाबत आपण बैठकीत संबंधितांना जाब विचारणार असल्याचे संचालक बसवराज इटकळे यांनी सांगितले.
माथाडी कामगारांच्या आरोग्याचा कुणीच विचार केला नाही. कामगारांचा हा घटक वंचित आहे. सेवा-सुविधा तर दूरच. शिवाय धूळ अन् फुफाट्यानं आम्हा कामगारांचं आयुष्य कुठे तरी कमी होत चाललंय. मार्केट कमिटीने रस्ते टकाटक करण्याबरोबरच धुळीचा बंदोबस्त करावा.-सिद्धाराम हिप्परगी, अध्यक्ष- सिद्धेश्वर श्रमजिवी कामगार संघटना.