संताजी शिंदे
सोलापूर : अॅड. राजेश कांबळे यांच्या खुनातील आरोपी संजय ऊर्फ बंटी खरटमल याच्या पत्नीने तालुका पोलीस ठाण्याच्या पाठीमागील पांडुरंग वस्तीतील घरातून सामान घेऊन पुणे गाठले. चार मुलांना सोबत घेऊन पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
अॅड. राजेश कांबळे यांच्या खुनातील आरोपी बंटी खरटमल हा पत्नी व चार मुलांसमवेत पांडुरंग वस्तीत राहत होता. खून होण्याच्या एक महिना आधी त्याचे पत्नीसोबत भांडण झाले होते. भांडण झाल्याने पत्नी मुलांसमवेत गुलबर्गा येथील माहेरी निघून गेली होती. घरात कोणी नव्हते, दरम्यान, बंटी खरटमल याने अॅड. राजेश कांबळे यांच्या खुनाचा कट रचला होता. ८ जून २०१९ रोजी बंटी खरटमल याने अॅड. राजेश कांबळे यांना गुलबर्गा येथील केस देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. चहात झोपेच्या गोळ्या टाकून अॅड. राजेश कांबळे याला बेशुद्ध केले, दरम्यान, त्यांच्या डोक्यात हातोडा मारून खून केला.
खून झाल्यानंतर १० जून रोजी अॅड. राजेश कांबळे यांचे सत्तूर व कोयत्याने तुकडे केले. वेळेत मृतदेहाची विल्हेवाट लावता न आल्याने १२ जून रोजी खुनाचा गुन्हा उघडकीस आला. पोलिसांनी पंचनामा करून बंटी खरटमल याच्या घराला सील केले होते. बंटी खरटमल याची पत्नी चार दिवसांपूर्वी सोलापुरात आली. तिने पोलिसांना विनंती करून घराचे सील काढण्यास लावले. बंटी खरटमल याला दोन मुले, दोन मुली असून ९ वी, ७ वी, ५ वी आणि दुसरीमध्ये जवळच्याच एका शाळेत शिकत होते. सर्व मुलांचे दाखले काढून घेतले व सील काढल्यानंतर घरातील सामान घेऊन ती पुण्याला निघून गेली.
बंटीच्या पत्नीला कोणी बोलत नव्हते...- पतीने केलेल्या प्रतापानंतर बंटीची पत्नी घरी आली तेव्हा तिला कोणी बोलत नव्हते, ती शेजारच्यांना बोलण्याचा प्रयत्न केला असता कोणी तिच्या जवळ जात नव्हते. ती रडत होती, शेवटी तिने आपले सामान भरले आणि घर सोडून निघून गेली.
बंटीबद्दल बोलायला कोणी तयार नाही...- बंटी खरटमल याला वस्तीमध्ये सहसा कोणी जास्त बोलत नव्हते. तोही वस्तीत जास्त थांबत नव्हता, त्याला दोन मुले आहेत. दोन्ही मुले तसे भांडखोर स्वभावाचे होते, वस्तीतील दुसºया मुलाने जर भांडण केले तर बंटीची मुले आक्रमक होत होती. या प्रकाराला बंटी खरटमल हा खतपाणी घालत होता, त्यामुळे इतर मुले त्याच्या मुलांसोबत राहत नव्हती असे स्थानिक लोकांनी बोलताना सांगितले. दबक्या आवाजात चर्चा करतात; मात्र खुनाच्या घटनेनंतर आजतागायत त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही.
घरामध्ये बंटी नेहमी विक्षिप्त वर्तन करीत होता...- बंटी खरटमल हा नेहमी घरात आलेली मांजरे पकडून त्यांना मारून टाकत होता. दारात आलेल्या कुत्र्यांनाही तो अशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न करीत होता. माती विटाचे घर असल्याने तो नेहमी विटांवर हात मारून तो तोडण्याचा प्रयत्न करीत असे. त्याच्या या विक्षिप्त स्वभावामुळे आजूबाजूचे लोक त्याच्या बद्दल मनात भीती बाळगत होते. शेवटी त्याने त्याचे रौद्ररूप स्थानिक लोकांना दाखवून दिले.