राजकुमार सारोळे राकेश कदम शीतलकुमार कांबळे
सोलापूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा सामना करताना ४३ लाख १८ हजार लोकसंख्येच्या आरोग्य सेवेसाठी एक हजार लोकांमागे एक आरोग्य कर्मचारी उपलब्ध असल्याचे जिल्हा आरोग्य सेवेत उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावरून दिसून येत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यावर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक आरोग्य, जिल्हा आरोग्य आणि वैद्यकीय सेवा विभागाची यंत्रणा कामाला लावली आहे. या तिन्ही विभागांकडे डॉक्टर, नर्स, तंत्रज्ञ, आरोग्य सेवकांची उपलब्ध संख्या केवळ ४ हजार ३४३ इतकी आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येचा विचार करता एक हजार लोकांमागे १.००५७ कर्मचारी आरोग्य सेवेसाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढेल तशी ही सेवा कमी पडू लागल्याने खासगी आरोग्य सेवेत असलेल्या डॉक्टर व कर्मचाºयांची मदत घेण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेंतर्गत असलेल्या ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ४२७ उपकेंद्रांत १५६ डॉक्टर, ८८७ नर्स व आरोग्य कर्मचारी सेवा देत आहेत. त्याचबरोबर अडीच हजार आशा वर्कर आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अंतर्गत ७६ डॉक्टर व इतर कर्मचारी सेवा देत आहेत. याचबरोबर महापालिकेकडे १० डॉक्टर आणि ११० कर्मचारी आणि सिव्हिल हॉस्पिटलकडे १३३ डॉक्टर व नर्स सेवा देत आहेत. जिल्हा आरोग्य विभागाने नोंदणीकृत ८२० दवाखाने अधिग्रहित करून यातील १९०३ डॉक्टर, २८१० नर्स, २४४ तंत्रज्ञ, १५७५ चतुर्थश्रेणी कर्मचारी, १०६२ सफाई कर्मचारी यांच्या मदतीने ९ हजार ५८० बेड व २२ व्हेंटिलेटर अधिग्रहित करून उपचार सुरू केले आहेत. भविष्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यास कोविड केअर व हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी करून कर्मचारी भरतीची तयारी करण्यात आली आहे. नगरपालिका व महापालिकेकडे उपचार करणारी दवाखाने नसल्याने सगळा भार सिव्हिल हॉस्पिटलवर येत असल्याचे चित्र दिसत आहे.
जुलैमध्ये रुग्ण वाढलेसोलापुरात १२ एप्रिल रोजी पहिला रुग्ण आढळला. मे मध्ये शहरातच संसर्ग दिसून आला. जिल्ह्यात जूननंतर संसर्ग सुरू झाला. जुलै महिन्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. रॅपिड अँटिजेन किटमुळे रुग्णांमध्ये आठवड्यात दुपट वाढ झाली.
खासगी सेवा अधिग्रहितजिल्ह्याच्या लोकसंख्येच्या आधारावर आरोग्य यंत्रणा तोकडी आहे. डॉक्टर व आरोग्य सेवकांची निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या मदतीने ३४५ खासगी हॉस्पिटल व ४४२ डॉक्टरांची सेवा वर्ग केली आहे. यातून ३१९७ जादा खाटा उपलब्ध झाल्या असून, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आणखी पदभरतीचे नियोजन केले आहे. तसेच जिल्ह्यात ५०२ खासगी डॉक्टरांची सेवा सुरू आहे. - डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा आरोग्याची मदतजिल्ह्यात नगरपालिका व मोठ्या गावांमध्ये मिळून ३ उपजिल्हा व ११ ग्रामीण रुग्णालयात कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने १४३ खासगी हॉस्पिटल अधिग्रहित करून ४३७ डॉक्टरांची सेवा वर्ग केली आहे. यातून २ हजार ९० खाटा उपलब्ध झाल्या आहेत. अधीक्षक व वैद्यकीय अधिकाºयांची पदे रिक्त असल्याने अडचणी येत आहेत. कोरोनासाठी तात्पुरती पदभरती करण्यात येणार आहे. - डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक