सांगोला ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकासह तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र, गेल्या १२ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकाचे पद भरले नसल्याने प्रभारी वैद्यकीय अधीक्षकावर कामकाज सुरू आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीनपैकी दोन पदे भरली असून एक वैद्यकीय अधिकारी एक महिन्यापासून रजेवर असल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार एकाच डॉक्टरवर सुरू आहे. कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना खासगी दवाखान्यात पाठविले जाते. याचा गरीब व गरजू रुग्णांना नाहकचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे.
डॉक्टरांसाठी वेट ॲण्ड वॉच
ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदा अभावी रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. तर कधी कधी रूग्णांना डॉक्टरांची वाट पाहत बसावे लागते. त्यामुळे सध्या ग्रामीण रुग्णालय सलाईनवर आहे.
ग्रामीण रुग्णालयात लोकप्रतिनिधींनी सल्लागार समिती व रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांची नियुक्ती केली आहे. मात्र तसे फलक लावण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष
रुग्णांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. यासह विविध कारणांनी ग्रामीण रुग्णालय रुग्णांना असून अडचण, नसून खोळंबा असे गैरसोयीचे ठरत आहे. सध्या ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून परिसराच्या स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयातील अंतर्गत स्वच्छतेबाबतही असेच चित्र पहावयास मिळत आहे. रुग्णांच्या वॉर्डमधील गाद्या खराब अवस्थेत असून वॉर्डमधील कोपऱ्यात पडलेला कचरा वेळच्या वेळी उचलला जात नाही. रुग्णांच्या वार्ड शेजारी असणारे स्वच्छतागृह अस्वच्छ असल्यामुळे रुग्णांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने रुग्णालय परिसरात व अंतर्गत वार्ड, शौचालय, प्रसाधनगृहे, स्वच्छ ठेवून रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांतून होत आहेत.
फोटो ओळ ::::::::::::::::::
सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या पूर्वेकडील बाजूस शवविच्छेदन गृहाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत प्लास्टिकसह केरकचरा साचल्याचे छायाचित्र.