पंढरपूर : शहरातील रेल्वेस्टेशन परिसरातील पुंडलिकनगर येथे झालेल्या घरफोडीचा सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. या प्रकरणी दीपक महादेव थोरात (वय ३५ वर्षे, रा. करवडी, विटा-कराड रोड, ता. कराड, जि. सातारा) व दादासाहेब ह्यऊर्फ दत्ता नाथा कांबळे (वय २८ वर्षे रा. येवती, ता. कराड जि. सातारा) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ लाख ८४ हजार ८६३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोविंद रघुनाथ सबनीस (रा. पुंडलिकनगर रेल्वेस्टेशन, पंढरपूर) यांच्या घरी २८ जून ते ३० जून २०२१ या कालावधीदरम्यान घरफोडी झाली होती. त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के, रोख रक्कम, मोबाइल फोन इत्यादी असा एकूण १ लाख १८ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत गोविंद सबनीस यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि रवींद्र मांजरे यांचे पथक पंढरपूर शहरात असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ही घरफोडी, चोरी ही कराड शहरातील सराईत गुन्हेगार यांनी केली आहे. त्या अनुषंगाने अधिक माहिती घेऊन पोलीस पथकाने कराड येथील दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांनी मागील एक ते दीड महिन्यापूर्वी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहा. पोनि. रवींद्र मांजरे, सपोफौ. खाजा मुजावर, पोलीस हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी केली आहे.
::::: रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार ::::
पंढरपूर शहरात झालेल्या घरफोडीतील चोरीस गेलेले सोन्याचे नेकलेस, सोन्याचे टॉप्स, सोन्याचे दागिने व चांदीचे शिक्के, समई, चांदीचे ताट असा एकूण २ लाख २४ हजार ८६३ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पकडलेल्या इसमांपैकी एक इसम हा सांगली व सातारा जिल्ह्यातील रेकॉर्डवरचा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध इस्लामपूर, सांगली, कराड येथे गुन्हे दाखल आहेत. या दोघांना पंढरपूर शहर पोलीस ठाणेच्या ताब्यात दिले असून त्यांच्याकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.