या प्रकरणात संजीवनी पाटील यांचा चार एकरमधील जवळपास साडेचार लाख रुपये, विजय बिराजदार यांच्या दोन एकरमधील एक लाख ऐंशी हजार तर पंडित पाटील यांच्या दीड एकरातील तीन लाख रुपयांचा ऊस जळून खाक झाला. या घटनेची माहिती कळताच चपळगाव व बावकरवाडी येथील तरुणांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. यानंतर तरुणांनी एकत्रित येऊन आग विझविली. विशेष म्हणजे या भागात एकालगत एक असे १०० एकर उसाचे क्षेत्र आहे. तरुणांनी आटोकाट प्रयत्न केल्याने हा ऊस वाचविता आला. यानंतर तलाठी दत्तात्रय पांढरे, विजय पवार यांनी लागलीच पंचनामा केला. या प्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस पाटील विवेकानंद हिरेमठ, दिलीप गजधाने, तम्मा कांबळे, नीलकंठ पाटील, अनिल बिराजदार, माजी उपसरपंच शोएब पटेल, सिद्धाराम ढाले, तम्मा सोनार यांच्यासह तरुण उपस्थित होते.
महिला शेतकऱ्याचा टाहो
दरम्यान, चपळगाव येथे रविवारी ऊस जळाला. यामध्ये विधवा असणारी संजीवनी शरणप्पा पाटील यांचा चार एकर ऊस जळाला. ही घटना डोळ्यासमोर घडताना संजीवनी पाटील यांना शोक अनावर झाला. त्या टाहो फोडताच उपस्थितांनादेखील शोक अनावर झाला. शासनाकडून विधवेला मदत मिळावी अशी चर्चा उपस्थितांमधून झाली.