पंढरपूर : टेंभुर्णीकडून पंढरपूरला येणार्या मिनी बसच्या चालकाला रस्त्यात उभा असलेला कंटेनर दिसला नसल्याने शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास भोसे येथील दिवाण मळ्याजवळ दोन वाहनात अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जी. देवराजन गुरुस्वामी (वय ६१, रा. तोरणापूर, जिल्हा तिरुमपुरम, राज्य तामिळनाडू) हे एम. एच. ०४ एफ. के. ५८८ या क्रमांकाच्या मिनी बसमध्ये आपल्या कुटुंबासह व नातेवाईकांसह टेंभुर्णीकडून पंढरपूरकडे येत होते. यावेळी भोसे (ता. पंढरपूर) येथील दिवाण मळ्याजवळील रस्त्यावर एच. आर. ४७, ६२३३ या क्रमांकाचा कंटेनर उभा होता, परंतु त्या कंटेनरला उभे राहण्याचे कोणतेही चिन्ह व रिफ्लेक्टर नसल्याने ती मिनी बस जी. देवराजन यांना दिसली नाही यामुळे अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांचा मुलगा श्रीनिवास जी देवराजन (वय ३५, रा. तोरणापूर, जिल्हा तिरुमपुरम, राज्य तामिळनाडू) याला डोक्याला व पोटाला जादा मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. तसेच सुरेशकुमार जी देवराजन, आर ललिता राजाराम, डी प्रमिला जी देवराजन, एल दीपा लक्ष्मीपती, लालकृष्ण रेड्डी हे जखमी झाले. पुढील तपास सपोनि. एस. व्ही. मंगाणे करीत आहेत.