सोलापूर - इंटरनेटवर इलेक्ट्रीक ओला स्कुटर गाडीची जाहिरात पाहिली अन् पंढरपूर तालुक्यातील उंबरगावचे माजी सरपंच यांची फसवणूक झाली. विजय पवार यांना गाडी आवडली म्हणून त्यांनी संबंधितांशी संपर्क केला. त्यानंतर, कंपनीच्या फोन पे अकाऊंटवर 75 हजार रुपयेही पाठवले. मात्र, गाडीही भेटली नाही, अन् पैसेही परत मिळाले नाहीत. म्हणून विजय पवार यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
२ डिसेंबर २०२१ रोजी विजय पवार यांना ‘ओला स्कूटर एस-१ प्रो’ या गाडीची माहिती इंटरनेटवरून मिळाली होती. ही स्कूटर बॅटरीवर चालणारी व जास्त ॲव्हरेज देणारी असल्याने त्यांना ती आवडली. त्यांनी गुगलवर सर्च केले असता, त्यांच्या मोबाईलवर ‘थॅक्यू फॉर युवर मेसेज’ असा व्हॉटस्-ॲप मेसेज आला व त्यांना ९७३०३२८७१९ या मोबाईलवर संपर्क करण्यास सांगितले. पवारांनी त्या मोबाईलवर व्हॉटस्-ॲप मेसेज करून नाव, पत्ता दिला. त्यानंतर तत्काळ त्यांना ८२७४०६०१७४ या नंबरवरून फोन आला. त्याने ओला स्कूटरची माहिती देऊन किंमत १ लाख २४ हजार ९९९ रुपये सांगितली. त्यावेळी त्याने पवार यांना फोन करून पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, बँकेच्या पासबुकची प्रत व एक आयडेंटी साईज फोटो व ई-मेल आयडी असे व्हॉटस्-ॲप वर पाठविण्याबाबत सांगितले. पवार यांनी सर्व कागदपत्रांचे फोटो दिलेल्या नंबरवर पाठविले. त्यानंतर पवार यांना लगेच फोन करून पैसे भरण्यासाठी सांगितले. तसेच व्हॉटस्-ॲपवर ज्या बँक अकौंटची डिटेल दिली त्या कर्नाटका बँकेचे अकौंट नंबर ४३८२५००१०१३३४००१, आयएफएससी कोड नंबर केएआरबी०००००९४ असा होता. यासह अन्य खात्यावर पवार यांनी एकूण ७५ हजार रुपये पाठवले आहेत. पवार यांनी त्यांना पावती मागितल्यावर ई-मेलवरून पावती पाठवण्यात आली; मात्र पावती पाहून पवार यांना संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे.
ओळखपत्र पाहून आला संशय...
संशय आल्यानंतर पवार यांनी कंपनीबाबतची कागदपत्रे मागून कंपनीचे सी.ई.ओ. भाविश अग्रवाल यांचा फोन नंबर मागितला. त्यावेळी त्यांनी पवार यांना सेल्स मॅनेजर म्हणून अमोल अशोक वाळके यांचे कंपनीचे ओळखपत्र व आधार कार्ड पाठविले. ते सकृतदर्शनी खोटे असल्याचे दिसून आल्याने माझी फसवणूक झाल्याचे पवार यांच्या लक्षात आले.