सोलापूर : पारपंरिक शेतीला पर्याय म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. सोलापूरसारख्या दुष्काळी जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी रेशीमशेतीने स्वतःचे जीवनमान उंचावले आहे. मोहोळ तालुक्यातील सौदागर पांडव हे त्याचेच एक उदाहरण… साधारण १० ते १२ वर्षांपूर्वी पारंपरिक शेती व कृषीपूरक व्यवसायांतून वार्षिक दीड लाख रूपये उत्पन्न घेणारे पांडव आज वार्षिक एकरी सहा ते सात लाख रुपये रेशीम शेतीमधून सहज मिळवित आहेत.
मोहोळ तालुक्यातील मौजे पिरटाकळी येथे राहणाऱ्या पांडव यांनी बारावीनंतर कृषी पदविकेचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता शेतीची आवड असल्याने वडिलोपार्जित ५ एकर क्षेत्र शेतीमध्ये भरीव उत्पन्न घेण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला शेतीचे उत्पन्न वाढण्यासाठी कुक्कुटपालन, शेळीपालन व दूधव्यवसाय इ. शेतीपूरक व्यवसाय ते करीत असत. कुक्कुटपालन - शेळीपालन - दुधव्यवसाय यापेक्षा कमी जोखीम असल्याने व कमी श्रमात, कमी खर्चात रेशीम शेतीमध्ये सहजासहजी हमखास व शाश्वत उत्पन्न मिळत गेल्याने सौदागर पांडव यांना रेशीम शेतीची आवड निर्माण झाली.
दरम्यान, प्रचलित असलेले तुतीवाणची एकरात लागवड केली. लागवडीनंतर कीटक संगोपन गृह उभारुन रेशीम शेती करू लागलो. त्याकाळी कोषाचे दर कमी असल्याने एकरी प्रती वर्षी एक लक्ष ते दीड लक्ष उत्पन्न मिळायचे. आता हेच उत्पन्न एकरी सात लाखांपर्यंत पोहोचले आहे. रेशीम शेतीमध्ये अन्य कृषिपूरक व्यवसायासारखे दैनंदिन कष्ट नसून, महिन्याला एकदाच मार्केटिंग करायचे असते. तसेच, महिन्याला एकदाच कचरा (वेस्टेज) साफसफाई करावयाची असल्याने इतर शेतीची कामे करून रेशीम शेती करणे सोयीचे झाले झाल्याचे पांडव सांगतात. शिवाय, कुटुंबातील आई, वडील, एक भाऊ व त्यांची धर्मपत्नी यांच्या सहकार्याने काम होत असल्याने बाहेरील मजुरी खर्चाची बचत होते.