सोलापूर : साहब हम बहुत बेचैन है. पुरा दिल गाव की ओर लगा है. माँ और बेटियों की बहुत याद आती है. साब मेरे जैसे शोलापूर मे बहुत लोक पडे है. हमे बिहार, युपी जाने दो साब. उधर योगीजी आम्ही लेने के लिये तयार है, आप हमें महाराष्ट्र से भेज दो साहब... अशा विनवण्या बिहारी, उत्तर प्रदेशातील बाबू (मजूर) मोठ्या भावूकपणे करताहेत.
सोलापुरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी आणि चिंचोली एमआयडीसी परिसरात तीन हजारांहून अधिक परप्रांतीय मजूर अडकून आहेत. यात सर्वाधिक बिहारी, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल येथील मजुरांचा समावेश आहे. त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. उत्तरप्रदेश येथील जोनपूर गावातील रहिवासी रवींद्र यादव सांगतात, मला ३ मुली आणि एक मुलगा आहे. सर्वजण लहान आहेत. दयानंद कॉलेजसमोरील कपाट तयार करण्याच्या दुकानात मी गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. लॉकडाऊनमुळे आमची रोजीरोटी बुडाली आहे. पोटभर जेवण मिळतेय पण घरच्यांची आठवण झाली की आम्ही हताश होतोय.
रवींद्र सांगतात, त्यांच्या प्रमाणे सोलापुरात हजारो लोक विविध लोखंडी कपाट तयार करणाºया फॅक्टरीमध्ये अडकून आहेत. काही गादी फॅक्टरी मध्ये काम करतात. सध्या मालकांकडून राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था सुरू आहे. मालकांकडून आणखीन किती दिवस सोय होईल, याची काही शाश्वती नाही. त्यामुळे परप्रांतातील मजुरांची काळजी प्रशासनाकडून घेण्यात यावी अशी मागणी देखील रवींद्र यादव यांच्यासारख्या परप्रांतीय कामगारांकडून होत आहे.
लॉकडाऊन काळात अडकलेल्या लोकांकरिता उत्तरप्रदेश आणि बिहारकडून विशेष बसची सुविधा करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारकडून देखील विशेष बसद्वारे परप्रांतीयांना त्यांच्या घरी सोडण्याची व्यवस्था व्हावी. आम्ही बिहार आणि उत्तरप्रदेशला जायला तयार आहोत आमची टेस्ट करा, त्यानंतरच आम्हाला सोडा. उत्तर प्रदेश सरकार आम्हाला घ्यायला तयार आहे, तुम्ही फक्त सोडण्याची तयारी करा. महाराष्ट्र सरकारने आमच्यावर कृपा करावी आम्हाला आमच्या घरी जाऊ द्यावे.-रवींद्र यादव, रहिवासी जोनपूर, उत्तरप्रदेश (सोलापुरातील मजूर )