पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खंडू हनुमंत काळे (रा. गुळपोळी काळे वस्ती) यांची आई मंदाकिनी हनुमंत काळे या आजारी असल्याने पांडुरंग काळे यांनी त्यांना बार्शी येथे उपचारासाठी घेऊन गेले. खंडू शेतावरील वस्तीवर एकटा असल्याने त्यांनी त्याचे दोन मित्र समर्थ लंगोटे व प्रशांत राऊत यांना बोलावून घेऊन हे तिघे जण झोपले. मध्यरात्री रात्री २ वाजताच्या दरम्यान शेतावरील वस्तीवर तीन-चार अज्ञात चोरटे घरावरील दरवाजावर लाथा मारून घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी खंडू काळे यांना जाग आल्याने त्यांनी दोन्ही मित्रांना उठवले. त्यावेळी समर्थ लंगोटे यांनी फोन वरून गुळपोळी येथील पोलीस पाटील यांना फोन केला. पोलीस पाटील बाळकृष्ण पिसे यांनी तत्काळ ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या नंबरवर फोन केला. त्यावेळी गावातील सर्व लोकांना एकाच वेळी फोन गेल्याने सर्व जण जागे झाले. उपसरपंच निरंजन चिकणे, विशाल तुकाराम डोके, योगेश महादेव राऊत, ओंकार पाटील, वैजनाथ काळे, राजेंद्र काळे, योगेश चिकणे, शरद माळी यांच्यासह २०-२५ जण तत्काळ मदतीसाठी काळे वस्तीवर पोहोचले. तेव्हा काही अज्ञात चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
...............
४५ मिनिटांत पोलीस दाखल झाले
केवळ ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गुळपोळी येथील घरफोडीचा डाव उधळला गेला आहे व ४५ मिनिटांमध्ये बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, रियाज शेख, गोरख मेहरे, बळीराम बोंद्रे यांचे पथक दाखल झाले. कारण, पोलिसांनाही एकाच वेळी काॅल गेला होता. त्यामुळे पोलीसही रात्री दाखल झाले.