कोरोना लढ्यात प्राण गमावणाºया योद्ध्यांना ‘शहीद’ असे संबोधा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 12:27 PM2020-05-18T12:27:08+5:302020-05-18T12:31:47+5:30
सर्वोच्च न्यायालयास विनंती; सोलापूरच्या वकिलांनी पाठविले पत्र
सोलापूर : कोरोनाविषयी गंभीर लढ्यात आपले प्राण गमावणाºया योद्ध्यांना ‘शहीद’ संबोधा, अशी विनंती करणारे पत्र सोलापुरातील वकील मंडळींच्या वतीने अॅड. मंजुनाथ कक्कळमेली यांनी सर्वाेच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एस.ए. बोबडे यांना दिले आहे. पोलीस, डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी, सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करीत आहेत.
कोविड-१९ हा संसर्ग सध्या वाढत आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. डॉक्टर आपल्या कुटुंबाची पर्वा न करता २४ तास रूग्णसेवा बजावत आहेत. या रुग्णसेवेत परिचारिका, रुग्णालयाचे कर्मचारी आपले मोठे योगदान देत आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा बजावताना ही मंडळी एक प्रकारे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत. ही सेवा बजावत असताना यातील काही जणांना आपले प्राण गमवावे लागले.
‘कोरोनामुळे त्यांचा मृत्यू’ असा उल्लेख न करता ‘कोरोनासारख्या युद्धातील शहीद’ असे त्यांना संबोधले पाहिजे, असे अॅड. कक्कळमेली यांनी पत्रात म्हटले आहे. कोरोनाने मृत्यू होणाºयांचा अंत्यविधी शासकीय इतमामात व्हावा व त्यांच्या कुटुंबीयांना पूर्ण वेळ पगार देण्यात यावा, युद्धात शहीद होणाºया जवानांना ज्या सवलती असतात त्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देण्यात याव्यात. याबाबतचे निर्देश केंद्र शासनाला द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
संदर्भाचाही केला उल्लेख...
- चीन सरकारने आपल्या एका डॉक्टराला मरणोत्तर हुतात्मा म्हणून जाहीर केले आहे. २१ एप्रिल २0२0 रोजी ओडिसा सरकारने कोरोनाविरुद्ध लढणाºयांना योद्धा जाहीर केले आहे. याबाबतचा संदर्भ जोडला आहे. भारतात शहीद कोणाला संबोधावे याबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नाही. त्यावर सुद्धा उपाययोजना करण्याबाबत केंद्र शासनाला निर्देश द्यावे, असेही मुख्य न्यायमूर्ती एस.ए. बोबडे यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाचे संकट वाढत आहे, याला दोन हात करण्यासाठी सध्या डॉक्टर, पोलीस व रूग्णालयातील कर्मचारी समोर येऊन लढत आहेत. आपण सध्या घरात बसून स्वत:चे संरक्षण करीत आहोत, मात्र ही मंडळी आपला जीव धोक्यात घालत आहेत. सध्या सीमेवरच्या जवानांची भूमिका हे लोक पार पाडत आहेत. मृत्यूनंतर त्यांचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून मी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्र पाठविले आहे.
-अॅड. मंजुनाथ कक्कळमेली,
सदस्य सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर.