सोलापूर : उत्तर प्रदेशच्या घटनेला जालियनवाला बाग म्हटल्याने आमच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. या केंद्राच्या दबावाला जरा सुध्दा भीक घालणार नाही, त्यांना काय करायचे आहे ते करू द्या असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साेलापुरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार टिकवायचं असेल तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना बळ देण्यासाठी हातात हात घालून सर्वांनी काम करावे. ऊस उत्पादकांना बिल देण्यासाठी जुनी पध्दत योग्यच असल्याचेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्य्या निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. त्यामध्ये अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयांचा समावेश आहे. या छाप्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात तुफान बॅटिंग केली. काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असाही टोला पवारांनी लगावला.