रॉय बिवास बिरेन (वय ३८, रा. घाट पातीला, ता. वनगाय, जि. चोवीस परणाना, पश्चिम बंगाल, सध्या रा. तुंगत) हे मागील अनेक वर्षांपासून तुगंत येथे तुंगत व आजूबाजूच्या गावातील रुग्णांवर उपचार करत आहेत. रॉय बिरेन याच्याकडे रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात शासकीय परवानगी नाही. त्याचबरोबर त्याचे वैद्यकीय शिक्षणही झाले नाही. तरीही तो रुग्णांवर औषध उपचार करून नागरिकांचा जीव धोक्यात घालत होता. यामुळे त्याच्यावर २०१५ साली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी तो तीन महिने पंढरपूर तालुक्यात राहिला हाेता. त्यानंतर त्याच्या मुळ गावी परत गेला. दोन वर्षांने पुन्हा तारखेला आला अन् पुन्हा त्याने तुंगतमध्ये वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. परंतु कोरोनाच्या संकटामुळे तो दीड वर्षांपासून गावी होता. मागील १५ दिवसांपूर्वी तुंगत येथे आला अन् रुग्णांवर उपचार करू लागला. याची बातमी मिळताच पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम व तालुका आरोग्य निरीक्षक डॉ. एकनाथ बोधले यांनी रॉय बिरेन यांच्या रुग्णालयात धाड टाकली. रॉय बिरेन याला ताब्यात घेतले. बिरेन याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
........
सहा महिने तुंगतमध्ये अन् सहा महिने बंगालमध्ये राहायचा
बंगाली डाॅक्टर रॉय बिरेन हा सहा महिने तुंगत (ता. पंढरपूर) येथे नागरिकांवर अवैधरीत्या औषधोपचार करत होता, तर सहा महिने पैसे जमा करून तो आपल्या मूळगावी घाट पातीला (ता. वनगाय, जि. चोवीस परणाना, पश्चिम बंगाल ) येथे जाऊन राहत असे व पुन्हा तुंगत येथे येऊन सहा महिने राहत हाेता.