एप्रिल ते ऑगस्ट २०१९ अखेर वित्तीय वर्ष २०१९-२० या कालावधीत सांगोला तालुक्यातील चारा छावण्यांसाठी प्राप्त १०२ कोटी २८ लाख रुपयांच्या अनुदानापैकी सुमारे ७९ कोटी ८५ लाख रुपयाचे अनुदान यापूर्वीच छावणी चालकांना अदा केले आहे. उर्वरित २२ कोटी ५४ लाख रुपये ऑफलाइन पद्धतीने असल्याने वाटप करता येत नाहीत. त्यामुळे शासनाला परत पाठवले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील चारा छावण्यांच्या अनुदानाची रक्कम शासनाकडून येणे असल्याने बहुतांश छावणी चालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील छावणी चालकांनी आमदार शहाजीबापू पाटील यांची भेट घेऊन शासनाकडील अनुदानाची प्रलंबित रक्कम परत मिळावी म्हणून कैफियत मांडली होती. याबाबत आमदार पाटील यांनी आपण राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे मागील एक वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व चारा छावणी संस्थांचे अनुदान व अनामत रक्कम लवकरच परत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.