सांगोला : लघुपाटबंधारे अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी व आपत्कालीन दरवाजा न उघडल्यामुळे नीरा उजवा कालवा अंतर्गत सांगोला शाखा कालवा क्र. ५ कि.मी ४४ ला फुटून भगदाड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जावू लागल्याने 'दुष्काळात तेरावा महिना' अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान अचानक कालवा फुटल्याने नजीकच्या शेतकऱ्यांच्या ४ विहिरी पाण्याने बुजून शेतक-याचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान कालवा बुजविण्याच्या ठिकाणी यंत्रसामुग्री जाण्यास अडचण येत असल्याने कालवा बुजविण्यास विलंब लागणार आहे .ही घटना काल गुरूवार ११ जून रोजी तीनच्या सुमारास चिणके (ता.सांगोला) येथील सोनारसिध्द मंदिराजवळ घडली आहे.
नीरा उजवा कालवा अंतर्गत सांगोला शाखा कालवा क्रमांक ५ ला उन्हाळी आवर्तनाचे १० दिवसापूर्वी पाणी सोडले आहे मात्र लघुपाटबंधारे बांधकाम अधिकारी यांच्यातील नियोजनाअभावी शेतकरीच पाणी वाटपाचे नियोजन करीत आहेत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान सांगोला शाखा कालवा क्र ५ चिनके गावाच्या सोनारसिद्ध मंदिराजवळून पुढे जात आहे गावालगत असणाऱ्या ओढ्यावर शिवकालीन बंधारा असून या बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती तसे निवेदन ही तहसीलदार व पाटबंधारे अधिकारी यांना दिले होते, दरम्यान या कालव्याच्या शिवकालीन बंधाऱ्याच्या आपत्कालीन दरवाजाला अधिकाऱ्यांनी शेतकरी दरवाजा काढून पाणी घेतील म्हणून वेल्डिंग करून दरवाजा बंद केला होता.
कालव्यातून २०० क्यूसेसचा पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे व आपत्कालीन दरवाजा न उघडल्यामुळे किमी ४४ ला कालव्यास भगदड पडून फुटला. अचानक हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांची धावाधाव सुरू झाली .कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने कालव्या नजीकच्या देवानंद मिसाळ , महादेव मिसाळ , हरिभाऊ खराडे ,अंकुश चव्हाण या चार शेतकऱ्यांच्या विहिरी पाण्याने व गाळाने बुजून गेल्या आहेत . कालवा फुटून पाण्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीवरून नुकसान झाले आहे, त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व संबंधित अधिकार्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.