बार्शी: शाहीर अमर शेख चौकातून बार्शी-कुर्डूवाडी बायपास रस्त्यावर कांदलगाव परिसरात खासगी जागेत तालुका पोलीस ठाणे स्थलांतरित करण्याला माजी मंत्री दिलीप सोपल यांनी विरोध दर्शविला आहे. हे स्थलांतर रद्द करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
बार्शी शहरात कार्यरत असलेले तालुका पोलीस स्टेशन शाहीर अमर शेख चौक येथून बार्शी-कुर्डूवाडी बायपास रस्त्यावर कांदलगाव रोडनजीक खासगी जागेत नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. पोलीस स्टेशनची हद्द पाहता हे स्थलांतर नागरिकांच्या गैरसोयीचे ठरणार आहे. त्यामुळे हे स्थलांतर रद्द करावे अशी मागणी माजी मंत्री दिलीप सोपल यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
वास्तविक पाहता तालुका पोलीस स्टेशनशी संबंधित बहुतांश गावे ही बार्शीच्या उत्तर पश्चिम दक्षिण भागात जास्त संख्येने आहेत. पोलीस ठाणे सध्या आहे त्या जागी ठेवावे अथवा बार्शी नगरपरिषदेच्या जवाहर हॉस्पिटल आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर या परिसरात स्थलांतरित करावे अशी मागणी सोपल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
काही लोकांनी जाणीवपूर्वक हे तालुका पोलीस ठाणे अत्यंत गैरसोयीच्या अशा बायपास रस्त्यावरील खासगी जागेत नेण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाला पोलीस ठाणे अंकित सर्व गावांचा विरोध आहे. सामान्य नागरिकांची गैरसोय होणार आहे. हे स्थलांतर थांबविण्याबाबत प्रशासनाला आदेश काढावेत अशीही मागणी करण्यात आली आहे.
----
फोटो : ०६ बार्शी पोलीस ठाणे