सोलापूर : सोलापुरातील एकमेव नाट्य केंद्र असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिराची केलेली भाडेवाढ त्वरीत रद्द करावी अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्याकडे केली आहे. पुणे, मुंबई, नाशिक सारख्या कलाकारांना न परवडणारी ही भाडेवाढ असल्याचेही आ. शिंदे यांनी आयुक्तांना सांगितले.
सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर या सांस्कृतिक सभागृहाचे भाडेवाढ महानगरपालिकेकडून नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. ही वाढ अत्यंत अवाजवी असून या सभागृहात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना खीळ घालणारी आहे. पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाण च्या होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना भौगोलिक दृष्ट्या सोलापूर तसेही खर्चिक असल्यामुळे हुतात्मा स्मृती मंदिरची झालेली ही भाडेवाढ बाहेरील कलाकारांना न परवडणारी आहे. त्याचप्रमाणे सोलापुरातील हौशी कलाकारांना देखील ही वाढ जास्त आहे.
सांस्कृतिक वातावरण टिकवून ठेवण्यासाठी सभागृह वाजवी दरात मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विविध कला जोपासण्यासाठी महानगरपालिकेकडून हुतात्मा स्मृती मंदिरची झालेली भाडेवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी मनपा आयुक्त यांना केली. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूर व कार्यकारी सदस्य अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबई चे पदाधिकारी उपस्थित होते.