सोलापूर : जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये नात्यातीलच उमेदवार असल्याने आता मतदान कोणाला करायचे, अशी संभ्रमावस्था नात्यातील लोकांना झाल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे काका-पुतणे, जावा-जावा, नणंद-भावजय, भाऊ-भाऊ आणि नात्यागोत्यांतील उमेदवार निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे केल्याने चांगली चुरस निर्माण झाली आहे. तसेच पळशी येथे काका-पुतण्यांमधील सामना रंगतदार बनला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुंभारी येथेही चुलत बहिणींमध्ये थेट लढत होत आहे.
करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे जावई-सासऱ्यांमध्ये लक्षवेधी लढत होत आहे.
माढा तालुक्यातील कुर्डू येथे चुलत भावांमध्ये चुरशीची लढत होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथे भावाविरुद्ध भाऊ; तर जाऊबाईविरुद्ध जाऊबाई अशी निकराची लढाई देत आहेत. साफळे येथे सासऱ्यापुढे हार न मानता सुनेेने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. तसेच वागदरीतही सासू विरुद्ध सून अशी थेट लढत होत आहे.
कुंभारीत बहिणींमध्ये लढत
कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथे भाजपप्रणित श्री गेनसिद्ध-कुंभेश्वर ग्रामविकास पॅनलकडून रेणुका सीताराम इमडे-गुंडे यांना काँग्रेसच्या श्री शंभू-गेणसिद्ध ग्रामविकास पॅनलच्या गाौराबाई गुंडे यांनी आव्हान दिले आहे. या दोघी चुलत बहिणी आहेत. माजी सरपंच सीताराम इमडे यांची ती कन्या आहे. या निवडणुकीत सासरच्या नव्हे तर माहेरकडून या बहिणी लढत आहेत.
करकंबमध्ये नणंद-भावजय
करकंब (ता. पंढरपूर) येथे माजी पंचायत समिती सदस्य नरसाप्पा देशमुख व माजी सरपंच मारुती देशमुख या बंधूंच्या गटातच निवडणूक होत आहे. प्रभाग तीनमधून तेजमाला पांढरे या नणंदेच्या विरोधात तृप्ती पांढरे-देवकते ही भावजय आमने-सामने लढत आहे. याशिवाय नरसाप्पा देशमुख यांची सून कल्पना देशमुख व मारुती देशमुख यांची सून बबिता देशमुख यांची लढत होत आहे.
हिवरवाडी येथे सासऱ्याच्या विरोधात जावई
हिवरवाडी (ता. करमाळा) येथील प्रभाग क्र. २ मध्ये सासरे विरोधात जावई यांच्यात चुरशीची रंगतदार लढत होत आहे. बिरोबा ग्रामपरिवर्तन पॅनलचे मोहन भागवत इवरे या सासऱ्यांविरोधात बागल गटाचे बापू ज्ञानदेव इरकर या जावयाने निवडणूक रिंगणात दंड थोपटले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत आता पत्नी, सासूने जावयाची बाजू घ्यायची की पत्नी व मुलीने वडिलांना मतदान करायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.