सोलापूर/गुलबर्गा: रिबनपल्ली वागदरी राज्य महामार्गावर सेडमच्या कुरकुंटा रंजोळ फाट्यावर गुरुवारी पहाटे २ वाजता ट्रकवर कार आदळून झालेल्या अपघातात सोलापुरातील जोशी समाजाचे प. पू. विष्णुदास महाराज यांच्यासह चार जण ठार तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तिरुपतीहून देवदर्शन आटोपून परतताना हा अपघात झाला. कुरकुंटानजीक वाटेत बंद पडलेल्या सिमेंटच्या ट्रकला (ए.पी.२८ व्ही ६५०२) पाठीमागून आलेल्या कारने(एम.एच.१२ एच.एन. २५५७) जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोंडिबा नारायण सरवदे (५५), जोशी समाजाच्या तुकाराम मठाचे विष्णुदास महाराज (५०), श्रुती विनायक भोसले (७ महिने) आणि प्रीती विनायक भोसले(३) असे चार जण जागीच ठार झाले. तर विनायक कोंडिबा सरवदे (२७), मंगलाबाई कोंडिबा सरवदे (५०), राजश्री कोंडिबा सरवदे(२१), जयश्री विनायक भोसले (२४, सर्व रा. रविवारपेठ, सोलापूर) व कारचालक नागेश (३०, रा. कुंभारी) हे जखमी झाले आहेत. जखमींना गुलबर्गा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सेडम पोलिसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या अपघाताचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अमितसिंग, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक काशिनाथ तळकेरी, उपाधीक्षक महेश मेघण्णनवर, मळखेडचे फौजदार रविकुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघाताची माहिती मिळताच सरवदे यांच्या नातेवाईकांनी सेडम येथे धाव घेतली. जयश्री हिला उपचारासाठी सोलापूरला हलविण्यात आले असून, इतर चौघे गंभीर जखमी असल्याने गुलबर्गा येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. कोंडिबा सरवदे हे विष्णुदास महाराजांसह पत्नी, मुले व नातवंडांना घेऊन २५ मे रोजी तिरुपतीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतताना हा अपघात झाला. सोलापुरात अपघाताचे वृत्त समजताच रविवार पेठेतील मठाजवळ लोकांची गर्दी झाली. सायंकाळी चौघांचे मृतदेह सोलापुरात आणण्यात आले. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
---------------
अन् वास्तुशांती राहून गेली
तुकाराम महाराज मठासमोर कोंडिबा सरवदे यांनी नुकताच मोठा बंगला बांधला आहे. गृहप्रवेश केल्यानंतर मोठी वास्तुशांती करण्याचा त्यांचा इरादा होता. विष्णुदास महाराजांबरोबर त्यांचे स्नेहाचे संबंध होते. त्यामुळे तिरुपतीला सोबत येण्याचा त्यांनी आग्रह धरला. तिरुपतीचा प्रसाद आणून थाटात वास्तुशांती करण्याची त्यांनी तयारी केली होती. कार घेऊन मोठा मुलगा युवराज गोव्याला गेला होता. गोव्याहून परतताच वास्तुशांतीची मी तयारी करतो, तुम्हीच तिरुपतीला जा, असे म्हणून त्याने जाणे टाळले. पोलीस फोन करीत राहिले.... पहाटे दोन वाजेच्या सुमाराला हा अपघात झाला. अपघातठिकाणी पोलीस पोहोचल्यावर जखमींच्या खिशातील डायल क्रमांकावर त्यांनी फोन केले. पहिला फोन मुलगा युवराज याला केला, पण झोपेत त्यांना कळाले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या भावाशी संपर्क साधला. तिसरा क्रमांक मड्डी वस्तीतील जावयाला लागल्यावर संपर्क झाला. अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितल्यावर सर्व जण पहाटेच गुलबर्ग्याकडे रवाना झाले.
-----------------------------
अंत्यविधीसाठी लोटला
जनसमुदाय जोशी समाजाचे प. पू. सद्गुरू विष्णुदास महाराज यांच्या अपघाताची वार्ता कळताच रविवार पेठेतील तुकाराम महाराज मठासमोर समाजबांधव मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी समाजातील व्यसनमुक्ती व शाकाहारासाठी विशेष काम केले. गुरुवारी रात्री चौघांचे मृतदेह सोलापुरात आणण्यात आले. अंत्ययात्रेत समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.