सांगोला : मिरज महामार्गावर श्रीराम विद्यालयाजवळ बॅरिकेटींगला धडकून भरधाव वेगातील कार पलटी झाली. या अपघातात चालकासह पाचजण जखमी झाले. जखमींपैकी एकाचा पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रमेश प्रभाकर डहाळे (५०, रा. परळी वैजनाथ, जिल्हा बीड) असे अपघातात जखमी होऊन मरण पावलेल्याचे नाव असून २९ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मिरज- सांगोला महामार्गावरील जुनोनी येथील नवीन पुलावर हा अपघात झाला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून कार चालक मंगेश बिभीषण नागरगोजे, सूरज रमेशराव डहाळे (२७), मंचक भानुदासराव मुंडे (६०), माहेश्वरी नाथराव लटपटे (३९, सर्वजण रा. परळी वैजनाथ) हे चौघेजण जखमी झाले.
पोलीस सूत्रांकडील माहितीनुसार अपघातातील पाचजण मिळून २९ ऑगस्ट रोजी रात्री मिरज-सांगोलामार्गे कार (एम.एच. ४४/ एस. ०३६५) मधून निघाले होते. श्रीराम विद्यालयाजवळील नवीन पुलावर येताच कार चालकास रस्त्यावरील बॅरिकेट्स दिसून आले नाहीत. या अपघातात पाचहीजण जखमी झाले. अपघातानंतर गंभीर जखमी रमेश प्रभाकर डहाळे यांच्यावर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला.
---
कार पलटी घेत राहिली
अपघातादरम्यान बॅरिकेटींगला धकडून कार जुन्या डांबरी रस्त्यावर पलटी झाली. ती रस्त्यावर अनेक पलटी घेत राहिली. अपघातात चालक हा किरकोळ जखमी झाला तर इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. अपघातात कार चक्काचूर झाली. अपघातानंतर पोलीस नाईक विजय थिटे यांनी चौकशी करून मंगळवारी चालक मंगेश बिभीषण नागरगोजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
----
फोटो : ०७ सांगोला ॲक्सिडेंट
मिरज - सांगोला महामार्गावर अपघातात चक्काचूर झालेली कार.