सांगोला : पंढरपूर येथून देवदर्शन आटपून भरधाव वेगाने जाणारी कार खड्ड्यात आदळून टायर फुटून उलटली. या अपघातात पोलिस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला, तर एका चिमुकल्यासह तिघे जण जखमी झाले. हा अपघात रविवारी दुपारी ४:३० च्या सुमारास कोळे - पाचेगाव बु. रोडवर घडला.
महादेव अश्रुबा सोनावणे (वय ५३, सध्या रा. नागपाडा- मुंबई, मूळ रा. चिंचपूर -ई ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे हवालदाराचेनाव आहे. पत्नी जनाबाई महादेव सोनावणे (वय ४५, रा. चिंचपूर -ई, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर), वर्षा अरविंद दराडे (वय २६) व दक्ष अरविंद दराडे (वय ७ महिने, दोघेही रा. राशी, जि. अहिल्यानगर) अशी जखमींची नावे आहेत.
हवालदार महादेव सोनावणे हे मुंबई नागपाडा पोलिस स्टेशनला एसीबी इन्चार्ज म्हणून कर्तव्यास होते. ते पत्नी जनाबाई, मुलगी वर्षा दराडे, नातू दक्ष दराडे, तसेच अंकुश महाजन असे सर्व जण नातेवाईक मिळून एमएच ०३ ईएफ २४०१ इको कारमधून गाणगापूर, अक्कलकोट, पंढरपूर देवदर्शन करून रविवारी आटपाडी (जि. सांगली) मार्गे विट्यातील मुंबईला जाणार होते. मित्राचा पाहुणचार घेतलाआटपाडीत आल्यानंतर त्यांनी जुनोनीतील पोलिस मित्राला फोन करून परत नाझरे मठमार्गे जुनोनीला गेले. त्या ठिकाणी मित्राचा पाहुणचार घेऊन जुनोनी, कोळे भिवघाटमार्गे विट्याकडे निघाले होते. वाटेत पाचेगाव बु जवळ कार खड्यात आदळून टायर फुटल्याने हा अपघात घडला. अपघातात कारने दोन वेळा पलटी मारल्याने कारच्या खाली सापडून महादेव सोनावणे यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सोनावणे यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून त्यांच्या गावी पाठविण्यात आला.