सोलापूर : शहरात मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये १६८ गुन्हे दाखल झाले आहेत. मोबाईल सापडल्यास तो तत्काळ पोलीस ठाण्यात जमा करावा, अन्यथा संबंधितांवर चोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला असेल तर तो जेव्हा चालू होईल तेव्हा ट्रेसिंगद्वारे पोलिसांना सापडतो. सायबर सेलच्या माध्यमातून असे चोरीला गेलेले मोबाईल शोधण्याचे काम सुरू आहे.
शहरातील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजार पेठा, वर्दळीच्या ठिकाणी मोबाईल हरवणे किंवा चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. कमीत कमी ५ आण्1िा जास्तीत जास्त ३० ते ४० हजार रुपये किमतीचे मोबाईल हरवल्याच्या किंवा चोरीला गेल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. तक्रारींची शहानिशा होऊन पोलीस उपायुक्तांच्या सहीने मोबाईलचा शोध घेण्याचे पत्र तयार केले जाते.
तक्रारीवरून संबंधित मोबाईलचा ईएमआय नंबर बीएसएनएल, आयडिया, एअरटेल, जीओ आदी कंपन्यांना दिला जातो. कंपन्या संबंधित मोबाईलच्या ईएमआय नंबरवर ट्रेसिंग लावतात. हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलमध्ये दुसरे सीम कार्ड घालून वापर केला तरी तो ईएमआय नंबरवरून कोठे आहे हे समजते. मोबाईल कोणत्या भागात आहे, त्याच्यामध्ये कोणते सीम कार्ड घालण्यात आले आहे, तो नंबर कोणता आहे. हे कंपनीला समजते, त्यानुसार सायबर सेलला माहिती दिली जाते. सायबर सेल संबंधित पोलीस स्टेशनला माहिती देऊन मोबाईलचा शोध घेतला जातो.
बहुतांश गुन्ह्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भादंवि कलम ३१९ प्रमाणे मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात संबंधित चोरट्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते. सध्या घरातून, बाजारातून खिशातून किंवा पर्समधून मोबाईल चोरीचे प्रमाण वाढत आहे. हा मोबाईल महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांत, देशभर कोठेही गेला तरी तो शोधून काढता येतो. यासाठी फक्त मोबाईल चालू होणे आवश्यक आहे. पोलीस आयुक्तालयातील सायबर सेलच्या माध्यमातून नुकतेच १३ मोबाईल ट्रेस झाले असून ते हस्तगत झाले आहेत. मोबाईल पुन्हा संबंधित व्यक्तींना देण्यात आले आहेत.
सावधान राहा, मोबाईलची काळजी घ्या : अरुण फुगे- आज मोबाईल ही काळाची गरज होऊन बसली आहे. प्रत्येक क्षेत्रात मोबाईलवरून काम करणे शक्य झाले आहे. कामाचा भाग व स्वत:ची सोय म्हणून आपण महागडे मोबाईल खरेदी करतो. मात्र त्याची काळजीही तितकीच घेतली पाहिजे. लोकांनी सापडलेला मोबाईल जवळ ठेवू नये, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आहे. मोबाईल कधीही सापडू शकतो, गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकते. सेकंड हँड मोबाईल घेताना त्याची सत्यता पडताळून पाहिले पाहिजे. शक्यतो सर्वांनी आपल्या स्वत:च्या नावाचा मोबाईल वापरणे योग्य राहील, असे आवाहन सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी केले.