सोलापूर : दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने रुग्णसेवेवर ताण वाढत आहे. त्यातच ए ब्लॉकनंतर बी ब्लॉकमधील १०० बेडचे वॉर्डही फुल्ल झाला आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला असून याचा विचार करीत रुग्णालयात होणाऱ्या नियमित शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या आहेत.
सिव्हिल हॉस्पिटल हे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आहे. येथे कोरोना आजार असलेल्या गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात. फक्त कोविडसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ए ब्लॉकची क्षमताही १६५ पर्यंत वाढविण्यात आली असताना तो ब्लॉकही फुल्ल झाला आहे. तर बी ब्लॉकमधील कोविड वॉर्डही रुग्णांनी भरुन गेला आहे.
रुग्णांवर उपचार करणारे, शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना कोरोना रुग्णांवर उपचार करण्याचे काम दिले आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञांची कमतरता भासत आहे. कोरोना वाढत असताना शस्त्रक्रिया केल्या तर त्या रुग्णालादेखिल धोका होऊ शकतो. यामुळे नियमित शस्त्रक्रिया तात्पुरत्या थांबविण्यात आल्या आहेत. मागील वर्षीदेखिल कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर या शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. रुग्णसंख्या कमी झाल्यावर पुन्हा नियमित शस्त्रक्रियांना सुरुवात करण्यात आली होती.
प्रसूती, अपघात व अन्य प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरूच...
नियमित शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या असल्या तरी करोना संसर्गाच्या काळात प्रसूती, अपघात तसेच अन्य प्रकारच्या अपघातांच्या तातडीच्या शत्रक्रिया सुरूच ठेवण्यात आल्या आहेत. ज्या शस्त्रक्रिया काही काळाने केल्या तर रुग्णांच्या जीविताला धोका नाही, अशाच शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनातर्फे सांगण्यात आले.