सोलापूर :
के. एन. भिसे आर्टस, काॅमर्स व विनायकराव पाटील सायन्स काॅलेजच्या प्राचार्य भरती संदर्भात धर्मादाय उपायुक्त यांच्या न्याय निर्णयाच्या प्रतित बदल करत बोगस व बनावट कागदपत्रे शिक्षण संचालकांकडील ऑनलाइन पोर्टलवर सादर केल्याप्रकरणी माढा न्यायालयाच्या आदेशानुसार कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंग ऊर्फ विनायक गणपत पाटील (रा. कुर्डूवाडी, ता. माढा) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फिर्याद संस्थेचे सभासद राजाभाऊ जयवंत सुसलादे (रा. कुर्डूवाडी, ता. माढा) यांनी दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे सदर संस्थेचे सभासद असून, पांडुरंग ऊर्फ विनायक गणपत पाटील हे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. सदरची संस्था ही भोसरे (ता. माढा) येथे कार्यरत असून, या संस्थेमध्ये प्राचार्य पदावर २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत आर.आर.पाटील हे कार्यरत होते. दि. १ मार्च २०२२ पासून आर.आर. पाटील हे सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेले प्राचार्य पद भरण्यासाठी उच्च शिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडे संदर्भित पद भरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला गेला होता. त्यामध्ये संस्था अध्यक्षांनी स्वतः आवश्यक ते कागदपत्रांची पूर्तता करून योग्य ती प्रक्रिया केली असल्याचे बोगसपणे भासवले. यादरम्यान ऑनलाइन प्रस्ताव सादर करताना सोलापूर येथील धर्मादाय उपायुक्त यांच्या कोर्टातील काही न्याय निर्णयाच्या छायांकित प्रती जोडल्या होत्या. त्यामध्ये अध्यक्षांनी स्वतः च्या फायद्यासाठी बदल केल्याचे फिर्यादीस निदर्शनास आले.
धर्मादाय उपायुक्त यांच्या कोर्टातील कार्यकारी मंडळाचा अर्ज क्र. ७००/२०१४ हा खरा असतानाही संदर्भीय न्याय निर्णयातील अहवालाच्या छायांकित प्रतीत बदल करून ७००/२०१९ असल्याचे शिक्षण संचालनालयास खोटे भासवून फसवणूक केली आहे. यामुळे सादर केलेल्या प्रस्तावात कागदपत्रे खरे असल्याचे प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष यांनी स्वतः च्या लेटरहेडवर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे स्वतः च्या फायद्यासाठी धर्मादाय उपायुक्त, सोलापूर यांच्या कोर्टातील आदेशाबाबतच्या छायांकित प्रतींमध्ये फेरबदल करून, खाडाखोड करून बोगस कागदपत्रे प्राचार्य पद भरतीसाठी सादर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावरून माढा न्यायालयाच्या आदेशावरून आरोपीविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गोपाळ बासू पवार हे करत आहेत.