सोलापूर - हिंदू गर्जना मोर्चातील आयोजकांवर सोलापूर शहर पanrलिस दलात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोर्चावेळी व मोर्चानंतर कोणतीही अप्रिय घटना आंदोलकांनी केली नाही. अज्ञात लोकांनी केलेल्या घटनेचा कसून तपास करावा. कोणत्याही निष्कर्षापर्यंत न पोहोचता पाेलिसांनी थेट आयोजकांवर गुन्हा कसा दाखल केला? असा सवाल उपस्थित करीत गुन्ह्यातील आयोजकांची नावे मागे न घेतल्यास हायकोर्टात जाणार असल्याची माहिती हिंदूगर्जना मोर्चाचे धनंजयभाई देसाई यांनी लोकमत शी बोलताना दिली.
सोलापुरात रविवारी हिंदूगर्जना मोर्चा झाला. या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. मोर्चानंतर काही लोकांनी दगडफेक व बाटल्या फेकल्या. या घटनेमुळे पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलताना धनंजयभाई मेहता म्हणाले की, फिर्याद देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याची चौकशी करा, गुन्ह्यातून आयोजकांचे नावे कमी करा, या मागणीसाठी आज मंगळवार, दि. २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी पोलिस आयुक्तांची भेट घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना धनंजयभाई देसाई म्हणाले की, मोर्चा काढताना पोलिसांची रीतसर परवानगी घेतली होती. या मोर्चात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. काही समाजकंटकांनी मोर्चाला गालबोट लागावे, यासाठी काही घटना घडविल्या. यात आयोजकांचा काहीही संबंध नाही. पोलिसांनी घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करावी. मात्र, काहीही संबंध नसताना आयोजकांवर गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे. फिर्यादीत दाखल आयोजकांची नावे मागे घ्यावीत, घडलेल्या घटनेची चौकशी करावी, अन्यथा हायकोर्टात जाणार असल्याचेही देसाई यांनी सांगितले.