सोलापूर : ऊसतोडणी कामगार पुरवण्याच्या व्यवहारातून मोबाईलवरुन जातीवाचक शिवीगाळ करुन ‘तुझा मर्डर करण्यासाठी माझ्याकडे सुपारी आली आहे’ अशी धमकी दिल्याची तक्रार शंकर साहेबराव जगधने (वय- ६२, रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफूल, सोलापूर) यांनी दिल्याने चौघांविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी हे वनविभागातून निवृत्त झाले आहेत. स्वामी विवेकानंद नगरात ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सांगोला येथे त्यांची शेती आहे. शेती व ऊसतोडीसाठी ट्रॅक्टर वापरला जातो. जून २०२२ मध्ये फिर्यादीची नामदेव उर्फ पिंटू हनुमंत शिंदे , विकास नामदेव शिंदे, ऋषिकेश ज्ञानदेव शिंदे (रा. भिगवण, ता. इंदापूर), नवनाथ रमेश तरडे (रा. रोडेगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद यांच्याशी ऊस तोडणी कामगार पुरवण्यासाठी व्यवहार झाला होता. त्या अनुषंगाने ६ लाख ४८ हजार रुपये फोन पे व गुगल पे द्वारे पैसे घेण्यात आले होते. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी तीनच्या सुमारास मागील झालेल्या ऊस तोडणी कामगार पुरवण्याच्या व्यवहाराच्या अनुषंगाने फिर्यादीच्या ९१४५६९९३९४ या मोबाईलवर नवनाथ तरडे यांनी त्याच्या ९३५६४९३१८० या मोबाईलद्वारे फोन केला.
जातीवाचक शिवीगाळ करीत ‘ तुम्ही माजला आहात, ‘तुझा मर्डर करण्यासाठी माझ्याकडे सुपारी आली आहे’ अशी धमकी देण्यात आली. दोन दिवसांनी गावाहून परतल्यानंतर फिर्यादीने वरील चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त राजू मोरे करीत आहेत.