सांगोला : मांजरी येथे एकाच रात्रीत चोरट्यांनी नऊ दुकाने फोडून जवळपास होजिअरीच्या साहित्यासह २६ हजारांचा ऐवज पळविला.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी ग्रामपंचायतच्या व्यापारी संकुल आणि शंकर शिनगारे यांचे शॉपिंग सेंटर फोडले आहे. या चोरीच्या प्रकाराने गावात भितीचे वातावरण पसरले आहे.
मांजरी येथे पंढरपूर-सांगोला रस्त्यावर एसटी स्टँड चौकात ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलाचे गाळे आहेत. तसेच या परिसरात शंकर दादा शिनगारे यांचे शॉपिंग सेंटर आहे. चोरट्यांनी किराणा दुकान , साडी सेंटर, कृषी केंद्र, पान शॉप, पेपर स्टाँल अशा दुकानांना लक्ष केले आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास दुकानदारांनी स्वत:ची दुकाने बंद करून घरी गेले होते.
दरम्यान चोरट्यांनी गुरुवारी रात्री १२ नंतर शीतल घाडगे यांच्या ज्योतिर्लिंग किराणा दुकानाचे शटर उचकटून गल्यातील रोख १२ हजार रूपये पळविले. तसेच निसार मुजावर यांच्या किराणा मालाच्या दुकानातून दोन तेलाचे बॉक्स, बिस्कीटे व रोख ३ हजार रुपये, सोमनाथ शिनगारे यांच्या पान शॉप मधून रोख ३ हजार रुपये, किशोर पाटील यांच्या सिद्धनाथ एंटरप्राइजेस दुकानातून ६०० रुपयांची चिल्लर, कादिर मुजावर यांच्या पेपर स्टॉल दुकानातून ४०० रुपयांची चिल्लर, मंगलकुमार मेहता यांच्या लेडीज शॉपी सेंटर मधून साड्या, होजिअरी कपड्यासह ८०० रुपये, अमोल जगताप यांच्या बीज कृषी सेवा केंद्रातून रोख ३ हजार रुपये, विश्वंभर शिनगारे यांच्या खते बी बियाणे दुकानातून साहित्य पळविले. त्यानंतर चोरट्यांनी राहुल शिंदे यांच्या एलआयसी कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे, धनादेश, पुस्तके अस्ताव्यस्त फेकून दिले. दरम्यान शुक्रवारी सकाळी कादिर मुजावर हे पेपर स्टॉलवर आल्यावर गावात चो-या झाल्याचे समजले. याबाबत दुकान मालकांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
---
१९ सांगोला
मांजरी येथील ग्रामपंचायत गाळ्यात शटर उचकटून चोरट्यांनी साहित्य पळविले