सोलापूर: महाराष्ट्रात बंदी असलेला पान मसाल्याचा मालट्रक विजापूर हायवेवरील नांदणी टोल नाक्यावर पकडण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने ही कारवाई केली असून, २१ लाख ४५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कर्नाटकातून पान मसाला सोलापुरात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पथकाला सुचना दिल्या होत्या. बुधवारी सायंकाळी ५.३० अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, नंदिनी हिरेमठ व त्यांच्या पथकाने नांदणी टोल नाक्यावर सापळा लावला होता. दरम्यान मालट्रक (क्र.आर.जे१९ जी.बी-५७०७) विजापूर महामार्गावरून येताना निदर्शनास आली. पथकाने इशारा करून ट्रक बाजूला घेण्यास सांगितले, पाठीमागे तपासणी केली असता, त्यात बेकायदा पान मसाल्याचा साठा आढळून आला.
पथकाने वाहन चालकाकडे अधिक चौकशी केली असता, छत्रपती संभाजी नगर घेऊन जात असल्याचे सांगितले. पथकाने मालट्रकसह चालकाला मुद्देमालासह मंद्रुप पोलिस ठाण्यात आणले. अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी मालट्रक चालक सुमार आलम खान (रा. वडनावा जागेर, ता. पाचपट्टा, जि. बारमेर, राजस्थान), साथीदार रोशन शेरू खान (रा. कोडूला पारोदी, जि. बारमेर, राजस्थान) व इतर यांच्याविरुध्द फिर्याद दाखल केली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली, अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ, प्रशांत कुचेकर, नमुना सहाय्य्क श्रीशैल हिटनळ्ळी, विठ्ठल रहाटे यांनी पार पाडली.
उत्पादकापर्यंत तपास करा - प्रदीप कुमार राऊतमहाराष्ट्र शासन आदेशानुसार गुटखा सदृश्य प्रतिबंधित असलेल्या सर्व घातक पान मसाला वस्तुंच्या विक्रीवर बंदी आहे. मात्र महाराष्ट्रात कर्नाटकातून पानमसाला येत असल्याची माहिती मिळाली होती. आमच्या अधिकाऱ्यांनी माल जप्त केला असून मंद्रुप पोलिस ठाण्यात फिर्याद देेण्यात आली आहे. पोलिसांना आम्ही पान मसाला उत्पादकापर्यंत सखोल तपास करण्यास सांगितले आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली.
नांदणी टोल नाक्याजवळ पकडण्यात आलेला पान मसाला, मालट्रक चालकासह दोघांसमवेत अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी हिरेमठ, प्रशांत कुचेकर, नमुना सहाय्य्क श्रीशैल हिटनळ्ळी, विठ्ठल रहाटे.