सोलापूर : उजनी धरणाच्या जवळ शिराळ (टें) येथून भीमा नदीच्या फुगवटा पात्रातून बोटीने काढलेल्या वाळूने चार ब्रास भरून कुर्डूवाडी शहराकडे विक्रीसाठी आलेल्या टिपर प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्या पथकाने गुरुवारी पहाटे दोन वाजता सापळा लावून टेंभुर्णी-कुर्डूवाडी रस्त्यावर पकडला. यावेळी टिपरसह चार ब्रास वाळू जप्त करून प्रांताधिकारी कार्यालयात आणून लावला. त्यावर प्रांताधिका-यांनी अनाधिकृत गौणखनिज कायद्यान्वये कारवाई करून ३ लाख ४५ हजार ६०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
माढा विभाग, कुर्डूवाडीच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांच्यासह मंडल अधिकारी विशाल गायकवाड, सूर्यकांत डिकोळे, समदूरले, गावकामगार तलाठी प्रवीण बोटे, राजेंद्र चव्हाण, कोतवाल नवनाथ शिंदे, वाहन चालक अतुल दहिटणकर यांचे पथक उजनी धरण व भीमा नदीच्या पात्रातून विनापरवाना व अवैधरित्या वाळू उपसा वाहनांवर कारवाईसाठी गुरुवारी पहाटे दोन वाजता टेंभुर्णीच्या दिशेने निघाले होते.
तेवढ्यात समोरून एक टीपर (एम. एच. १२/ एच. डी. ५८५५) चार ब्रास वाळू घेवून कुर्डूवाडी शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. गुरुवारी सकाळी गुन्हा दाखल झाला. यावेळी प्रांत अधिकाऱ्यांनी सापळा लावून टिपर पकडला. चालक शहाजी अर्जुन थोरात (रा. अकोले बु,ता.माढा) याला ताब्यात घेत टिपर, चार ब्रास वाळू पकडून प्रांताधिकारी कार्यालयात आणून लावला.