सांगोला शहरातील अलराईननगर येथे ४०७ टेम्पो अवैध वाळू खाली करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या आदेशान्वये सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महेश पवार, पोलीस कॉन्सटेबल जयंत माळी, पोलीस कान्स्टेबल बाबासाहेब पाटील यांच्या पथकाला रविवारी पहाटे ५च्या सुमारास कडलासरोडवरून चारचाकी वाहन येताना दिसले. संशयावरून त्यास थांबण्याचा इशारा केला असता चालकाने सदरचे वाहन न थांबवता कडलास नाक्यावरून एस.टी. स्टँडरोडने पळून जाताना पोलिसांनी पाठलाग करून अलराइनगरकडे वळताना पकडले.
सदर टेम्पोच्या हौद्यामध्ये एक ब्रास वाळू भरलेली होती. चालकास राॅयल्टी, पास परवान्याबाबत विचारणा केली असता त्याने सदर वाळू खारवटवाडी येथील माण नदीच्या पात्रातून घेऊन आल्याचे सांगितले. यावेळी पोलिसांनी आठ हजारांची एक ब्रास वाळू व विनानंबरचा सुमारे दोन लाखांचा टेम्पो, असा २ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांनी जयकुमार दादासो केदार व बाळासो दत्तात्रय कांबळ (रा. खारवटवाडी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.