कुरुल (जि. सोलापूर) : मोहोळ तालुक्यातील वाघोली येथील दूध विक्रेत्याने मोटारसायकलवरून दुधाच्या कॅनमधूनच देशी, विदेशी दारूचे खंबे आणले आणि तो सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर पोलिसांच्या हाती सापडला. कामती पोलिसांनी त्या दारू वाहतूक करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय विश्वनाथ पाटील (रा. वाघोली, वय ३६) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे. पाटील हा मोटारसायकलला दुधाचे कॅन अडकवून देशी व विदेशी दारू घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. महामार्गावरून पेट्रोलिंग करीत असताना ती संशयित गाडी थांबवून चौकशी केली आणि दुधाचे कॅन उघडून पाहिले असता त्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या देशी व विदेशी दारूच्या एकूण ५५ बाटल्या आढळून आल्या. वाघोली येथून शेतकऱ्यांकडून दूध घेऊन तो सोलापूर येथे विक्रीसाठी रोज जात होता. गुरुवारी त्याने येताना सोलापूर येथून देशी - विदेशी दारूचे खंबे विकत घेतले आणि दुधाच्या रिकाम्या कॅनमधून वाहतूक करून घेऊन येत होता. ही माहिती पोलिसांना मिळाली अन् दुधाचा व्यवसाय करणारा तो दारूच्या बाटल्यांसह अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.