सोलापूर: माझ्यावर आणि कामगार युनियनच्या चार कामगारांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला, असे शंभर खोटे गुन्हे दाखल झाले तरी भीक घालणार नाही, असा इशारा श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी दिला. सोलापूरला विमानसेवा सुरू व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे. परंतु विमानसेवेला चिमणीचा अडथळा येत असल्याचे चुकीचे कारण पुढे केले जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कारखान्याचा ४९ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ काडादी यांच्या हस्ते उत्साही वातावरणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. चिमणीचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाच्या निकालानंतर कारखान्याची नाहक बदनामी केल्यास सहन करण्यात येणार नाही. जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
गेल्या हंगामात ७.७५ लाख मे.टन गाळप झाले. आणखी दोन लाख टन गाळप होणे अपेक्षित होते, असे सांगून काडादी म्हणाले की, यंदा पावसामुळे गळीत लांबण्याची शक्यता होती. परंतु परतीचा पाऊस अनिश्चित आहे. येत्या चार दिवसात गाळपास सुरुवात करावी लागेल. अद्याप काही सभासदांच्या ऊस बिलाची काही रक्कम देणे आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वी देण्यात येईल. अजून राज्य शासनाचे येणाऱ्या गाळप हंगामामधील उसाच्या एफआरपीची एकरकमी रक्कम देण्याबाबतचे धोरण जाहीर झाले नाही. इतर कारखाने धोरण जाहीर करीत आहेत. त्यांच्या धोरणाचा आणि परिसरातील कारखान्याच्या ऊसदराचा विचार करून लवकरच इतर कारखान्यांपेक्षा जास्तीत जास्त दर देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
या समारंभास सर्व संचालक, कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी अशोक बिराजदार यांनी तर आभारप्रदर्शन कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. दीपक आलुरे यांनी केले.
-
बारा टक्के वेतनवाढ
वेज बोर्डाच्या निर्णयाप्रमाणे कामगारांना १२ टक्के वेतनवाढ देण्याची अंमलबजावणी लवकरच करू. तसेच कामगारांना दिवाळीसाठी ८.३३ टक्के बोनस आणि दहा दिवसाचे बक्षीस वेतन देण्यात येईल, असे काडादी यांनी सांगितले.