मोहोळ तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायतीची निवडणूक लागली होती. यापैकी १३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने आता ६३ ग्रामपंचायतींमध्ये १२३४ सदस्यांसाठी निवडणूक लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सीआरपीसी १०७ प्रमाणे २२३ जणांवर कारवाई केली आहे. सीआरपीसी ११० नुसार १४ जणांवर कारवाई करण्यात आली. सीआरपीसी १४४ / २ नुसार दोन पेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या ३६ जणांचे तडीपारचे प्रस्ताव पाठवले आहेत, तसेच अवैद्य धंदे करणाऱ्या २२ जणांचेही तडीपारीचे प्रस्ताव पाठविले आहेत. १४९ प्रमाणे ४२६ जणांना नोटिसा पाठविल्या आहेत. याशिवाय ज्या गावात निवडणुका लागल्या आहेत अशा दारु, मटका व बेकायदेशीर वाळू व्यवसाय करणाऱ्या ३० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
५९ गावात भेटी देऊन निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचे पालन करण्यासाठी पोलीस पाटलांसमवेत बैठका घेतल्या आहेत. तरीही कोण शांतता व सुव्यवस्थेचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अशोक सायकर यांनी दिला आहे.
याशिवाय निवडणूक लागलेल्या संवेदनशील असलेल्या पेनूर, पाटकुल, खंडाळी, पापरी, शेटफळ, नरखेड, बेगमपूर, अंकोली, कुरुल, पोखरापूर या गावांमध्ये पोलिसांची फिरत्या गस्त पथकाची गाडी फिरत आहे. आचारसंहितेचा व कायदा, सुव्यवस्था भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.