सोलापूर : कोरोना काळात केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन धान्य मिळत असल्याने रेशन कार्डधारकांकडे स्वस्त धान्य शिल्लक राहात आहे. त्यामुळे बहुतांश लाभार्थी खुल्या बाजारात धान्य चढ्या दराने विकत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी राज्य सरकार कडक भूमिका घेणार असून, धान्य विकताना लाभार्थी आढळल्यास त्यांचे कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. याबाबत प्रशासकीय पातळीवर धोरणात्मक काम सुरू असल्याची माहिती आहे.
स्वस्त धान्य व्यापाऱ्यांना किंवा परत स्वस्त धान्य दुकानदारांना विकण्याचे प्रमाण वाढले आहे. अशी एक घटना खान्देशातील अमळनेर या ठिकाणी घडली. याबाबत तेथील तहसीलदारांनी कडक भूमिका घेतली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर साेलापुरातील अधिकाऱ्यांनी अशीच भूमिका घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकत असल्याची माहिती सर्वप्रथम ‘लोकमत’ने उघड केली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. लोकांच्या घरोघरी जाऊन काही व्यापारी धान्य गोळा करतायत. यासाठी जवळपास तीनशेहून अधिक रिक्षा कार्यरत असल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेण्याची गरज आहे.
शिधापत्रिकाधारकांची संख्या
- अंत्योदय : ६० हजार ६९७
- अन्नसुरक्षा : ४ लाख ६० हजार ८
- केशरी : ३ लाख ६३ हजार ३४७
- शुभ्र : ५७ हजार ४६५
- एकूण : ८ लाख ८४ हजार ५२
आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचली नाही. स्वस्त धान्य खुल्या बाजारात विकत असतील, तर ही बाब चुकीची आहे. त्यामुळे अशा घटना रोखणे गरजेचे आहे. आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही निश्चित कारवाई करू.
- वर्षा लांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर
लाभार्थींकडे धान्य शिल्लक राहात आहे. त्यामुळे लाभार्थी त्यांच्या मर्जीने धान्य विकतायत. नियमानुसार हे चुकीचे आहे. यात दुकानदारांचा काही दोष नाही. काही लाभार्थी संबंधित दुकानदारांनाच धान्य विकत असल्याची माहिती आहे. दुकानदारांनी धान्य विकत घेऊ नयेत. अन्यथा कारवाई होऊ शकते. याबाबत दुकानदार संघटना कडक भूमिका घेणार आहे.
- सुनील पेन्टर, अध्यक्ष, सोलापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटना, सोलापूर