‘राफेल’ दडविण्यासाठी सीबीआय अधिकारी हलविले, सुशिलकुमार शिंदे यांची मोदी सरकारवर टिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 02:46 PM2018-10-27T14:46:32+5:302018-10-27T14:48:20+5:30
सीबीआयचे अधिकारी राफेलची कागदपत्रे शोधून काढतील म्हणून एका रात्रीत त्यांना पदावरून हटविण्यात आले.
सोलापूर : सीबीआयचे अधिकारी राफेलची कागदपत्रे शोधून काढतील म्हणून एका रात्रीत त्यांना पदावरून हटविण्यात आले. अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशात हुकूमशाही चालवायची आहे. याविरुद्ध देशातून आवाज उठविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे बोलताना केले.
सोलापूर शहर जिल्हा काँग्रेसतर्फे बेलाटी येथील बीएमआयटीच्या कॉलेजमध्ये आयोजित संवाद प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव सोनल पटेल, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार भारत भालके, माजी आमदार दिलीप माने, निर्मलाताई ठोकळ, विश्वनाथ चाकोते, शहराध्यक्ष प्रकाश वाले, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे प्रवक्ते यशवंत हप्पे, हरीश रोगे, रत्नाकर महाजन, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविकात आमदार रामहरी रुपनवर यांनी संवाद प्रशिक्षणाचा हेतू स्पष्ट केला. उद्घाटनानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उघड केलेल्या राफेल घोटाळ्यावर भाष्य केले. तिप्पट किंमत देऊन राफेलचा सौदा झाला. सीबीआयचे अधिकारी हा घोटाळा उघड करतील म्हणून एका रात्रीत त्यांना काढून टाकण्यात आले. वास्तविक यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती, विरोधी पक्षनेता व पंतप्रधान या तिघांची कमिटी असते. पण पंतप्रधान मोदी यांनी एका सहीने वर्मा यांना काढून टाकले.
इंधनाचे दर गगनाला भिडल्याने मोदी सरकारच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. पेट्रोल पंपावरील मोदींच्या छबीला काळे फासण्याचे काम लोक करीत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले. काँग्रेसची भूमिका या विषयावर राजीव साहू आणि काँग्रेसची विचारधारा व धोरण यावर चैतन्य रेड्डी, काँग्रेसचा इतिहासवर हरीश रोगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अर्जुन पाटील, देवानंद गुंड, बाळासाहेब शेळके, गुरुसिद्ध म्हेत्रे, नागेश फाटे, गौरव खरात, बाळासाहेब देशमुख, केशव इंगळे, अंबादास गुत्तीकोंडा, जीवन आरगडे उपस्थित होते.
मोदींची स्पेशल पुडी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीला आल्यावर अंगात घातलेले जॅकेट सोलापुरातील आहे अशी स्पेशल पुडी सोडल्याची टीका सुशीलकुमार शिंदे यांनी केली. मला आश्चर्य वाटले. सोलापुरात सगळीकडे शोध घेतला पण जॅकेटचा शोध लागला नाही. २0१४ मध्ये निवडणूक प्रचारासाठी सोलापुरात आल्यावर मोदी म्हणाले की, सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे देशाचे गृहमंत्री आहेत. येथे हातमाग व यंत्रमागावर तयार होणारे कापड पॅरॉमिलीटरीला द्यायला हवा होता. पण मोदींना हे माहीत नाही की सियाचीनच्या मायनस ४0 अंश तापमानात हे कापड चालत नाही. सोलापूरकरांना अशी थाप मारून ते सत्तेवर आले पण येथील कापड व्यापाºयांना एक रुपयाची आॅर्डर मिळाली नाही. अशा प्रकारे मोदी यांनी देशभर बनवाबनवी केल्याचा आरोप शिंदे यांनी केला.