सोलापूर : महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या चौकात बसविलेले सीसी कॅमेरे देखभालीअभावी बंद पडत आहेत. कॅमेरे दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची यावरून वाद निर्माण झाला आहे.
महापालिकेने चार वर्षांपूर्वी शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसी कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे बसवून सर्व यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित केली आहे. त्यामुळे या कॅमेºयावर पोलीस आयुक्तालयाची निगराणी आहे. या कॅमेºयावरून वाहतुकीची शिस्त बिघडविणाºयावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. सीसी कॅमेºयातील नोंदीवरून राँग साईड, वेगाने जाणे, सिग्नल तोडणे असे वाहतुकीचे नियम तोडणाºयांना शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे दंड केला जात आहे. असे असताना कॅमेºयाची देखभाल व दुरुस्तीबाबत अनास्था दाखविली जात आहे.
कॅमेरा बंद पडला की महापालिकेकडे पत्रव्यवहार केला जात आहे. पोलीस कामाला सहकार्य म्हणून नगरअभियंता संदीप कारंजे यांनी अनेकवेळा संगणक विभागाला कॅमेरे दुरुस्तीची सूचना केली आहे. पण आता याचा खर्च उचलायचा कोणी यावरुन दुरुस्ती रखडली आहे. कॅमेरे दुरुस्तीबाबत पोलीस आयुक्तालयाने नुकतेच महापालिकेला पत्र दिले आहे.
या ठिकाणी आहेत कॅमेरे- महापालिकेने शहरात पाच महत्त्वाच्या ठिकाणी सीसी कॅमेरे बसवून पोलीस आयुक्तालयाकडे नेटवर्क दिलेले आहे. छत्रपती शिवाजी चौक (पांजरापोळ), छत्रपती संभाजी चौक (जुना पुणे नाका), महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (पार्क चौक), महात्मा गांधी चौक (स्टेशन) आणि विजापूर वेस या पाच ठिकाणी सीसी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी चौकातील कॅमेरे आॅफ्टिक फायबर केबल नेटवर्कमधून पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात जोडलेले आहेत. याचप्रमाणे स्टेशन चौकातील सीसीकॅमेºयाचे प्रक्षेपण नियंत्रण कक्षात आहे. विजापूर वेशीतील कॅमेरे बेगमपेठ पोलीस चौकीला जोडले गेले आहेत, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कॅमेºयाचे प्रक्षेपण महापालिकेकडेच आहे.
मेंटेनन्सचा करार नाहीमहापालिकेने या महत्त्वाच्या चौकात सीसी कॅमेरे बसवून चार वर्षे होत आली आहेत. कॅमेºयाचे मेंटेनन्स कोणी करायचे या वादात अनेक दिवस हे कॅमेरे बंद असतात. कॅमेरे बंद पडण्याची कारणे किरकोळ असतात. वारा किंवा इतर धक्क्याने कनेक्शन तुटणे, वीजपुरवठा व्यवस्थित न होणे यामुळे प्रक्षेपण बंद पडते. दुरुस्तीसाठी पोलिसांकडून महापालिकेकडे पत्रव्यवहार होतो अशी माहिती संगणक प्रोग्रॅमर मतीन सय्यद यांनी दिली.
महापालिकेतील ५५ कॅमेरे बदलणारमहापालिकेत सभागृह, इंद्रभुवन, प्रशासकीय इमारतीतील कार्यालये व बाहेरील बाजूस कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पण यातील बहुतांश कॅमेरे बंद पडले आहेत. त्यामुळे नव्याने ५५ कॅमेरे बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याप्रमाणे मनपा सभागृह : ११, भूमी व मालमत्ता : १७, बांधकाम परवाना : ९, सार्वजनिक आरोग्य विभाग : १७. सभागृहातील दोन सीसी कॅमेºयामध्ये रेकॉर्डरिंगची सुविधा असणार आहे.