सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक उत्सव रद्द केले असताना दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी गावामध्ये काही लोकांनी गुपचूपपणे गावची यात्रा साजरी केली. यासाठी शेकडो गावकरी एकत्रही आले. मात्र, गावातीलच एका अतिउत्साही तरुणाच्या मोबाईलमधून यात्रेचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ४० पेक्षाही जास्त गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून १७ जणांना अटक केली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली.नागम्मा देवीची यात्रा दरवर्षी अक्षयतृतीयेला भरते. यंदा लॉकडाउनमुळे छोट्या-मोठ्या यात्रांसह पंढरपूरची चैत्री यात्राही रद्द केली गेली. मात्र एका उत्साही कार्यकर्त्याने आपण गावातल्या गावात यात्रा साजरी करू या. कुणाला बाहेर सांगण्याची गरज नाही, असे फर्मान सोडून गावकऱ्यांना यात्रेसाठी तयार केले.यात्रेची तयारी झाली. रविवारी सकाळी काही गावकरी एकत्र जमले. या गर्दीतल्या लोकांकडे ना मास्क होता, ना कुणी शारीरिक अंतर पाळले. सालाबादप्रमाणे यात्रेचे विधी पार पडले. मात्र, गावातीलच एका तरुणाला या यात्रेचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरता आला नाही. त्याने गुपचूपपणे व्हिडिओ काढला आणि आपल्या काही मित्रांना मोठ्या कौतुकानं पाठविला. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. तो पोलीस यंत्रणेपर्यंत पोहोचताच पोलिसांचे एक पथक तत्काळ नांदणी गावात पोहोचले. कायदा धाब्यावर बसवून बिनधास्तपणे यात्रा साजरी करणाºया गावकºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला.>रात्री भीमास्नान आणि पहाटे अग्निप्रवेश !गावातील नागम्मा देवीच्या मूतीर्ची पालखी काढून शनिवारी रात्री चार किलोमीटर अंतरावरील भीमा नदीत स्नान घालण्यात आले. त्यानंतर रविवारी पहाटे अग्निप्रवेशाचा सोहळाही गावात करण्यात आला. यावेळी सुमारे सव्वाशे ते दीडशे गावकरी उपस्थित होते. मंदिराच्या पुजाºयासह काही जणांना पोलीस ठाण्यातही आणले गेले आहे.नांदणीत दवंडी दिली होती. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंदिराच्या दर्शनी भागात नोटीस लावण्यात आली होती. तसेच यात्रा अगर गर्दी न करणेबाबत सर्वांना कळवण्यात आले असताना देखील मंदिराचे पुजारी व चाळीस ते पन्नास ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन होमहवन केले. एकूण १७ आरोपींना ताब्यात घेतले आहे.- मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात चोरून यात्रा साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 4:34 AM