रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : तलावाच्या मधोमध असलेले श्री सिद्धरामेश्वरांचे मंदिर... भोवताली ऐतिहासिक भुईकोट किल्ला... निसर्गरम्य वातावरणातील ‘ए टेम्पल इन वॉटर’च्या प्रचार अन् प्रसारावर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी भर देणार असून, या नव्या संकल्पामुळे नेते, अभिनेते, विविध क्षेत्रांमधील नामवंत कलाकार आदींना यापुढे मंदिरात आणण्याचा संकल्प पंच कमिटीचे सदस्य बाळासाहेब भोगडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सोडला.
देशातील काही प्रमुख राज्यांना जोडणारे सोलापूर रेल्वे स्थानक हे प्रमुख केंद्र आहे. आंध्र आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेल्या या शहरापासून काही अंतरावर तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर ही तीर्थक्षेत्रे आहेत. दर्शनाच्या निमित्ताने दररोज असंंख्य भाविक सोलापुरात येत असतात. चादरी, टॉवेल्स उत्पादनामुळे परप्रांतातील व्यापारीही सोलापूर भेटीवर असतात. इथले आपले काम आटोपून भाविक, व्यापारी पुढे दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी, तुळजामाता, स्वामी समर्थ आणि गाणगापूरला रवाना होतात.
सोलापुरातील निसर्गरम्य वातावरणातील ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचे पाण्यातील भव्य मंदिराची त्यांना कल्पनाच नसते. राज्य, राष्ट्रीय स्तरावरील नेते, सेलिब्रिटी, कलावंत सोलापुरातून पुढे मार्गस्थ होताना त्यांना देवस्थान समितीकडून आमंत्रण मिळते. दर्शन घेतल्यावर त्यांचा यथोचित सन्मानही होतो. त्याच पार्श्वभूमीवर श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीही नव्या वर्षात हा उपक्रम राबविणार आहे.
बाळासाहेब भोगडे यांनी ही जबाबदारी घेतली असून, पंच कमिटीतील कर्मचाºयांच्या माध्यमातून हा नवा संकल्प तडीस देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास सोलापूरचे नाव सातासमुद्रापलीकडे जाईल, हे मात्र निश्चित.
ये तो सुवर्ण मंदिरसे बेहतरीन है -आडवाणी- भाजपाचे नेते लालकृष्ण आडवाणी हे मागे सोलापूर दौºयावर आले असता त्यांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिरास आवर्जून भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ‘ये तो सुवर्ण मंदिरसेही बेहतरीन है !’ असे गौरवोद्गार काढले होते. नामवंत व्यंगचित्रकार स्व. आर. के. लक्ष्मणही हेही मंदिरात आले होते. त्यांना एक कार्यक्रम आटोपून पुढे निघायचे होते. स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांना केवळ पाच मिनिट द्या, अशी विनंती करताच ते तयारही झाले. मात्र जेव्हा ते मंदिरात आले तेव्हा ते अर्धातास सभा मंडपात ध्यानात रमून गेले.
विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार सोलापुरात आले तर त्यांना नक्कीच पंच कमिटीकडून आमंत्रण दिले जाईल. त्यांना दर्शनासाठी आणले जाईल. जेणेकरुन भाविक, पर्यटक कसे वाढतील, याचा नक्कीच विचार करु. -बाळासाहेब भोगडे,सदस्य- श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी.