सोलापूर : सिद्धेश्वर प्रशाला व नूमवि शाळेत पिंक मतदान केंद्र राहणार आहे. या मतदान केंद्रांवरील सर्व कामकाज या महिलाच पाहतील. तसेच संगमेश्वर पब्लिक स्कूलमधील एका केंद्रावरील कामकाज दिव्यांग कर्मचारी हाताळणार आहेत. याशिवाय अक्कलकोट रस्त्यावरील एसव्हीसीएस व डफरीन चौकातील सेंट जोसेफ प्रशालेतील केंद्रावर युवक मतदान केंद्र राहणार आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी १०० मतदार बसू शकतील इतका मोठा मंडप असणार आहे. तसेच जारचे शुद्ध पाणी, बसायला बाकडे, दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर याशिवाय ओआरएस पाण्याचे स्वतंत्र जार आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असेही पडदुणे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस तहसीलदार नीलेश पाटील उपस्थित होते.