आप्पासाहेब पाटील, सोलापूर : आषाढी वारीच्या निमित्ताने वारी साक्षरतेची हा साक्षरता कार्यक्रमाच्या प्रसार, प्रचारासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांत विविध उपक्रम राबविण्यात आले असून या उपक्रमातून निरक्षर वारकरय्ंना साक्षर करण्याचा जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा प्रयत्न करण्यात येणार आहे. वारीकाळात केलेल्या कामांमुळे सोलापूरच्या साक्षरता वारीची केंद्रीय शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. केंद्रीय शिक्षण अवर सचिव प्रदीप हेडाऊ यांनी शिक्षणाधिकारी योजना यांच्या कामांचे कौतुक केल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना) सुलभा वठार यांनी दिली.
आषाढी वारी कालावधीत जिल्हाभरातील सर्व शाळांमध्ये प्रति साक्षरता दिंडी सोहळा पार पडला. वारीतील सर्व वारकऱ्यांना साक्षरता कार्यक्रमांच्या प्रसारपत्रकांचे वाटप करून प्रसार करण्यात आला. प्रत्येक पालखीसोबतच्या दिंडीचे पालखी मार्गावरील सर्व शाळांनी साक्षरता रांगोळी, प्रतिदिंडी, घोषवाक्य, बॅनर यासह राज्य साक्षरता दिंडीचे स्वागत केले. सोलापूर जिल्हयामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे वारकरी वर्ग, दिंडी व पालख्यांचे प्रमाण लक्षात घेता नियामक परिषदेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ११ ते १७ जुलै २०२४ या कालावधीत गीताद्वारे साक्षरता प्रचार करण्यासाठी मोहोळच्या स्वानंद टिचर्स म्युझिकल ग्रुपने स्वरचित रेकॉर्ड केलेला साक्षरता गीतांचा गीतमंच कार्यक्रम खूपच प्रभावी ठरला.