रुपेश हेळवे, सोलापूर : विठ्ठलाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी असून यंदा मध्य रेल्वे सोलापूर विभागातील पंढरपूर कार्तिक यात्रेसाठी २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत रेल्वेकडून विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेनेपंढरपूर कार्तिक यात्रेसाठी प्रवाशांच्या सोईसाठी लातूर - पंढरपूर- लातूर, पंढरपूर - मिरज - मिरज आणि मिरज - कुर्डुवाडी - मिरज दरम्यान विशेष शुल्का सहित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
यात लातूर- पंढरपूर- लातूर विशेष- १० फेऱ्या होणार आहेत. यात लातूर- पंढरपूर सोमवार रोजी पासून लातूर येथून सकाळी ७:३० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी दुपारी १२.५० वाजता पोहोचेल. शिवाय पंढरपूर - लातूर ही गाडी २० रोजी पंढरपूर येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि लातूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७ : २० वाजता पोहोचेल.
या गाडीला हरंगुळ, औसा रोड, मुरुड, ढोकी, कळंब रोड, येडशी, उस्मानाबाद, पांगरी, बार्शी टाऊन , शेंद्री , कुर्डुवाडी जं., मोडलिंब येथे थांबा असणार आहे. ही गाडी २०, २१, २२, २४ आणि २७ नोव्हेंबर रोजी धावणार आहे.
शिवाय पंढरपूर - मिरज- पंढरपूर या गाडीचे ८ विशेष फेरी होणार आहेत. सोमवारी पंढरपूर येथून ९.२० वाजता सुटेल आणि मिरज येथे त्याच दिवशी दुपारी १२.०५ वाजता पोहोचेल. मिरज - कार्तिक विशेष सोमवार रोजी मिरज येथून दुपारी १.१० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी संध्याकाळी ५.०५ वाजता पोहोचेल. ही गाडी २०, २१, २५ आणि २७ रोजी धावणार आहे. हीच गाडी मिरज- पंढरपूर - मिरज दरम्यान धावणार आहे.