लोकमत न्यूज नेटवर्क
कुसळंब : बार्शीत तालुक्यातील कुसळंब येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस गटशिक्षणाधिकारी साधना काकडे यांनी भेट देऊन कोरोनानंतरची स्थिती जाणून घेतली. शाळेने केलेली रंगरंगोटी, बोलक्या भिंती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
कोरोनामुळे कुसळंबमधील केंद्रीय जिल्हा परिषदेचे वर्ग भरत नाहीत. ऑनालईनवर सध्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम करवून घेतला जात असून या ऑनलाईन शिक्षणाचा आढावा त्यांनी घेतला. बऱ्याच शाळांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ या उपक्रमांतर्गत साधना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुसराम शाळेची रंगरंगोटी करण्यात आली. प्रवेशद्वार, कंपाउंड व दर्शनी भाग हा आकर्षक रंगांनी रंगवल्यामुळे शाळा आकर्षक वाटली. भिंतीवरील रंगकाम पाहून शाळेचे कौतुक केले. तसेच शाळेत राबविले जाणारे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम जाणून घेतले. प्रातनिधिक स्वरूपात पहिलीच्या वर्गातील विद्यार्थिनी इशिता ननवरे हिच्याशी संवाद साधला. यावेळी कुसळंबचे सरपंच शिवाजी खोडवे यांच्याशी मनरेगाअंतर्गत कामाविषयी चर्चा केली. यावेळी संजय बोकेफोडे, कुसळंबच्या केंद्रप्रमुख चित्रा उकिरडे, शाळेतील शिक्षिका वैशाली बांगर, अंकुश मुंढे, स्वाती नांदवटे, पालक शीला ननवरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन काशीद उपस्थित होते.
--------
२१ कुसळंब
कुसळंब जिल्हा परिषद केंद्रीय शाळेला भेट देऊन गटशिक्षणाधिकारी साधना काकडे यांनी आढावा घेतला.