सोलापूर : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक बुधवारी दुपारी सोलापुरात दाखल झाली असून पथकाकडून दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी सुरू आहे.बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेण्याचे काम पथक करीत आहे. या दुष्काळ पाहणी पथकात केंद्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरण व केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या उपसचिव सरोजिनी रावत यांचा समावेश आहे.
शुक्रवारी, १५ डिसेंबर पर्यंत पथक सोलापुरात राहणार आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश मंडल मध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळात नुकसानीत पिकांची तपासणी तसेच बाधित पीक क्षेत्राची पाहणी केंद्रीय पथक करणार आहे. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नुकसानीत पिकांची माहिती शासनाकडे पाठवली. या अहवालाच्या आधारे पथक स्पॉटवर जाऊन माहिती घेणार आहे. त्यानंतर, स्वतंत्र अहवाल तयार करणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.